esakal | परवड थांबणार : राहुरी विद्यापीठाचे कांदा बियाणे मिळणार ऑनलाइन
sakal

बोलून बातमी शोधा

कांदा बियाणे

परवड थांबणार : राहुरी विद्यापीठाचे कांदा बियाणे मिळणार ऑनलाइन

sakal_logo
By
रहिमान शेख

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील व संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली याही वर्षी विद्यापीठाच्या मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या कांदा बियाण्यांची विक्री ऑनलाईन होणार असल्याची माहिती बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांनी दिली. येत्या ११ जून रोजी बियाणांची ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे.

कोरोनामुळे गतवर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कांदा बियाणाची विक्री कशी करावी असा प्रश्न विद्यापीठाच्या अधिकारी वर्गाला पडला होता. कारण विद्यापीठाच्या कांदा बियाणाला नेहमीच प्रचंड मागणी असते व बियाणे विक्री पोलीस संरक्षणात सुद्धा करावी लागते. त्यामुळे मागील वर्षी ऑनलाईन पद्धतीने कांदा बियाणे विक्री करण्याचा निर्णय झाला होता.

हेही वाचा: श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक उमेश पोटे अपात्र

मागील वर्षी ऑनलाईन नोंदणीला आलेल्या अडचणी दूर करून संगणकीय प्रणालीमध्ये सुधारणा करून कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच कांदा बियाणे विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असे करा बुकिंग

नोंदणी पद्धत अत्यंत सोपी असून आधारकार्ड आणि सातबारा उतारा या पोर्टलवर अपलोड करून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी पूर्ण होताच लगेचच इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड यांचे सहाय्याने पेमेंट करून खरेदीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोपर्यंत पोर्टलवर बियाणांची उपलब्धता दिसते तोपर्यंतच बियाणे नोंदणी करावी. पोर्टलवरील बियाणे उपलब्धता संपताच पुढे नवीन नोंदणी व्यवस्थेमध्ये होणार नाही, याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन डॉ. सोळंके यांनी केले आहे.

बियाणाची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या संशोधन केंद्रावर (पिंपळगाव बसवंत, धुळे, राहुरी) बियाणे पुरवण्याची व्यवस्था डॉ. प्रमोद बेल्हेकर आणि त्यांच्या विपणन ग्रुपकडून पार पाडण्यात येणार आहे.

अॉनलाईन बियाणे शॉपिंग

ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या ऑनलाईन कंपन्यांच्या नोंदणीप्रमाणेच फुले ॲग्रो मार्ट पोर्टलवर नोंदणी करून लगेचच इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड याद्वारे पैसे भरून नोंदणी पूर्ण करता येईल, अशी माहिती बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांनी दिली. यासाठी https://www.phuleagromart.org या वेबसाईटवर ११ जून पासून ते बियाणे संपेपर्यंत कांदा बियाणे खरेदीची नोंदणी शेतकऱ्यांना करता येणार आहे.

प्रति आधारकार्ड, सातबारा उतारा दोन किलो बियाणे या प्रमाणात फुले समर्थ आणि बसवंत ७८० या बियाणाची नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी बियाणाचा दर प्रति किलो रुपये २०००/- असा असणार आहे.

फुले समर्थ कांद्याची वैशिष्ट्ये

विद्यापीठाचा फुले समर्थ हा आकर्षक गर्द लाल रंगाचा अधिक उत्पादनक्षमता खरीप व रांगड्या हंगामासाठी विद्यापीठाचा अत्यंत योग्य वाहन असून हलक्‍या जमिनीमध्ये ८० ते ८५ दिवसांमध्ये तयार होतो प्रति हेक्‍टरी २०० ते २५० क्विंटल कांद्याची उत्पादन मिळू शकते.

loading image
go to top