
Rahuri Students Protest : विद्यार्थ्यांकडून गेट बंद
राहुरी विद्यापीठ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२१ आणि २०२२ ला तत्काळ स्थगिती देऊन, कृषी अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय पूर्ववत करावा व तातडीने स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे, या प्रमुख मागणीसाठी २१ दिवसांपासून कृषी अभियांत्रिकीचे विद्यार्थी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीजवळ ठाण मांडून बसलेले आहेत.
आत्तापर्यंत राज्य सरकारने कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज या विद्यार्थ्यांनी प्रशासकीय इमारतीचे गेट बंद आंदोलन केले. अनेक आमदार, अधिकारी, अनेक राजकीय नेते, अनेक पदाधिकारी या आंदोलनास भेट देऊन गेले.
मात्र, काहीही उपयोग झाला नाही. कृषी अभियांत्रिकी शाखेची महाराष्ट्र राज्यातील शेतीच्या विकासासाठी गरज नसेल तर का म्हणून ही शाखा सुरू आहे? कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शेतकरी आई-वडिलांची फसवणूक का केली जाते? कृषी अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात का घातले जाते?
कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करायचे नसेल तर का कृषी अभियांत्रिकी सुरू आहे? आमच्या शिक्षणावर लाखोंचा खर्च करायला लावतात. जर आमचे भविष्य अंधारात असेल, तर मायबाप सरकारने या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अन्यथा कृषी अभियांत्रिकी शाखा बंद करावी, की जेणेकरून भविष्यात कृषी अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी भूमिका कृषी अभियंत्यांनी मांडली.आंदोलनाची व्याप्ती वाढतेय...
महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या नऊ कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सर्व विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, साखळी उपोषणही कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे. या उपोषणाचा आज चौथा दिवस होता.