राशीनमध्ये जुगाराच्या छाप्याएेवजी तोडपाण्याचीच चर्चा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

राशीनमध्ये लॉकडाऊनमध्येही मोठा जुगार जोमात सुरू असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. क्लबचालकांची या खेळात मोठी चांदी होत आहे.

राशीन : राशीन येथे रविवारी जुगारीच्या अड्डयावर पडलेल्या छाप्यापेक्षा त्यातील तडजोडीचीच चर्चा अधिक आहे. ती रक्कम सुमारे साडेतीन लाख रूपये असल्याचे बोलले जाते.
या बाबत सविस्तर माहिती अशी ः रविवारी (ता.17) राशीन येंथील पाण्याच्या टाकीशेजारी सुरू असलेल्या जुगारीच्या अड्डयावर नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून गजानन काळे, संदीप माने, सूरज उबाळे, श्‍याम भोसले, जीवन साळवे, बाळू नवले, अर्जुन सागडे या सात जणांना जुगार खेळताना मुद्देमालासह अटक करून पोलिस कॉन्स्टेबल संदीप विनायक चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सातही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या फिर्यादीत केवळ सोळा हजार चारशे साठ रूपयांच्या रोख रकमेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, साडेतीन लाखांपेक्षा जास्त रक्कमेचा जुगार यावेळी सुरू असल्याचीच चर्चा मोठी आहे. 

हेही वाचा ः टप्प्यात आले की पवार कार्यक्रम करतात...प्राजक्त तनपुरेंची राणे-पवार वादात उडी

छापा टाकलेल्या नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या या पथकात पोलिस नाईक विश्वास बेरड, सचिन अडबल, पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे, रणजित जाधव आदींचा समावेश होता. जुगारीतील साडेतीन लाखांच्या या तडजोडीचा आकडा ऐकून आज राशीनकरांच्या भुवया उंचावल्या. यातील सातही आरोपींचे जामीन रविवारीच झाले.

राशीनमध्ये लॉकडाऊनमध्येही मोठा जुगार जोमात सुरू असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. क्लबचालकांची या खेळात मोठी चांदी होत आहे. या व्यावसायिकांचे लागे-बांधे असल्याने जुगार चालकांविरूध्द क्वचितच कारवाई होते. कारवाई झालीच तर तडजोड करून ती दाबली जाते. हेच आतापर्यंत राशीनकरांनी पाहिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raid on Rashin's gambling club