जे पिकवले त्याची पुन्हा माती; टोमॅटो, बटाटा, उडदाचे नुकसान

सनी सोनावळे
Wednesday, 9 September 2020

पारनेर तालुक्‍यातील कान्हूर पठार, ढवळपुरी, टाकळी ढोकेश्वर, भाळवणीसह अन्य गावांमध्ये गेले दोन दिवस मुसळधार पाऊस झाला.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : पारनेर तालुक्‍यातील कान्हूर पठार, ढवळपुरी, टाकळी ढोकेश्वर, भाळवणीसह अन्य गावांमध्ये गेले दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. यात शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, जे पिकवले त्याची पुन्हा माती झाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 

कान्हूर पठार परिसरात पावसामुळे बटाटा, ढवळपुरी येथे ऊस, बाजरी, टोमॅटो, मक्‍यासह डाळिंब बागांनाही मोठा फटका बसला आहे. पठार भागावरील उडीद पिकाचेही मोठे नुकसान झाले. डाळिंब बागायतदारांवर तर मोठे संकट कोसळले.

अवघ्या काही दिवसांत या पिकांची तोडणी होऊन शेतकऱ्यांच्या हाती पैसे पडणार होते. मात्र, पावसाने सारे काही उद्‌ध्वस्त केले असून, ऐन काढणीच्या हंगामात हाता-तोंडाशी आलेला खरीप पिकांचा घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. नुकसानीचे पंचनामे करून त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी ढवळपुरी येथील प्रगतिशील शेतकरी संदीप वाघ, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली.

संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain damage to farmers in Parner taluka