पावसाने लावली रस्त्यांची वाट, कोल्हार घोटी राज्यमार्गावर

आनंद गायकवाड
Tuesday, 6 October 2020

संगमनेर तालुक्यात नेहमीपेक्षा अधीक प्रमाणात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन चांगलेच अस्ताव्यस्त झाले होते.

संगमनेर (अहमदनगर) : या वर्षी संगमनेर तालुक्यात नेहमीपेक्षा अधीक प्रमाणात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन चांगलेच अस्ताव्यस्त झाले होते. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातून जाणाऱ्या कोल्हार घोटी राज्यमार्गासह तालुक्याच्या इतर गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची वाट लागली आहे. 

संगमनेर या मध्यवर्ती शहराला जोडणारा कोल्हार घोटी राज्यमार्ग हा कायमच खड्डे व दुरवस्थेमुळे चर्चेत राहिला आहे. संगमनेर शहरातील तीन बत्ती नाका ते कोकणगाव पर्यंत रस्त्याची पावसाने चाळण झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या राज्यमार्गावरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली होती. मात्र याच दरम्यान पावसाच्या उग्र रुपामुळे खड्ड्य़ांच्या संख्येत मोठी वाढ झाली. 

नगर, शिर्डी, सोलापूर, पंढरपूर, नाशिक, अकोले या प्रवासासाठी लहान मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या या राज्यमार्गावरील प्रवाशांची यामुळे गैरसोय होत आहे. तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या आश्वी बुद्रूककडे मांची मार्गे जाणाऱ्या रस्त्याचीही दुरवस्था झाली असून, मांची शिवारातील रस्त्यावर पडलेल्या मोठ्य़ा खड्ड्यात दुचाकी, चारचाकी वाहने फसू नयेत यासाठी एका जागरुक नागरिकाने या खड्ड्यात मोठी काठी उभी करुन, सावधगिरीचा इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे.

या शिवाय तालुक्याला जोडणाऱ्या व तालुक्यातील इतर गावांनाही परस्परांशी जोडणाऱ्या गाव रस्त्याची पावसाने मोठी हानी झाली आहे. यामुळे दैनंदिन कामासाठी तालुक्याला किंवा बाजारपेठेच्या गावी जाण्यासाठी त्रास होत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain pits on roads in Sangamner taluka