राजेंद्रदादा भाजपात, अनुराधाताई काँग्रेसमध्ये...नागवडे कुटुंबात अनोखी युती

संजय आ. काटे
Friday, 19 June 2020

खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज अनुराधा यांनी राजेंद्र नागवडे अध्यक्ष असलेल्या संस्थेच्या सोनिया गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालयात खास कार्यक्रम घेतला. तेथे त्यांनी भाषणात कॉंग्रेसचे महत्त्व व गांधी घराण्याचा देशासाठीचा त्याग विशद केला. 

श्रीगोंदे : राज्यात आणि देशातही भले भाजप व कॉंग्रेसमधून विस्तव जात नसेल. मात्र, श्रीगोंद्यात एकाच घरात आणि तेही पती-पत्नी या दोन्ही पक्षांचे राजकारण अगदी खुबीने करीत आहेत. नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून भाजपच्या कार्यक्रमांना हजेरी लावून पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचवितात.

दुसरीकडे, कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम घेऊन अनुराधा नागवडे यांनी गांधी घराण्याचा देशासाठीचा त्याग सांगितला. 

हेही वाचा -त्यांना आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना पाहिलंय- थोरातांचा विखे पाटलांना टोला

दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांचे चिरंजीव राजेंद्र यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप उमेदवार आमदार बबनराव पाचपुते यांच्या विजयासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांनीही भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केला.

पत्नी अनुराधा नागवडे यांना भाजपची उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात होते. त्यासाठी त्या भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पुण्यात भेटल्याचीही चर्चा होती. मात्र, अखेर पाचपुते यांच्या गळ्यातच उमेदवारीची माळ पडली. त्यानंतरही राजेंद्र नागवडे भाजपसाठी सक्रिय राहिले. 

क्लिक करा - याला म्हणतात भाऊभाऊ...एक उपजिल्हाधिकारी दुसरा नायब तहसीलदार

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राजेंद्र नागवडे भाजपमध्ये जास्त दिसले नाहीत. मात्र, मध्यंतरी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या तालुक्‍यातील कार्यक्रमांना हजेरी लावून ते अजूनही भाजपमध्येच असल्याचे दाखवून दिले. एकीकडे पती भाजपसाठी झटत असताना, अनुराधा नागवडे यांनी मात्र कॉंग्रेसच्या झेंड्याखाली काम सुरूच ठेवल्याचे दिसते.

अर्थात, त्यांच्याकडे पक्षाचे महिला कॉंग्रेसचे प्रदेशाचे पदही आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून त्या तालुक्‍यात पक्षवाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे आज पुन्हा एकदा दिसले. 

खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज अनुराधा यांनी राजेंद्र नागवडे अध्यक्ष असलेल्या संस्थेच्या सोनिया गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालयात खास कार्यक्रम घेतला. तेथे त्यांनी भाषणात कॉंग्रेसचे महत्त्व व गांधी घराण्याचा देशासाठीचा त्याग विशद केला. 

थोरात-विखे गट एकत्र 
जिल्ह्याच्या राजकारणात मंत्री थोरात व विखे पाटील यांच्यात विळ्या-भोपळ्याचे नाते असले, तरी श्रीगोंद्यात व विशेषत: नागवडे कुटुंबात पक्षासोबतच थोरात व विखे गटांची अनोखी युती झाल्याचे दिसते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajendradada in BJP, Anuradhatai in Congress