दिवंगत राजीव गांधी हे विज्ञान व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक

आनंद गायकवाड
Thursday, 20 August 2020

21 व्या शतकातील विकास व आधुनिकतेचा मंत्र असणार्‍या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील भारतीयांची कामगिरी आज जागतिक पातळीवर अभिमानास्पद ठरली आहे.

संगमनेर (अहमदनगर) : 21 व्या शतकातील विकास व आधुनिकतेचा मंत्र असणार्‍या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील भारतीयांची कामगिरी आज जागतिक पातळीवर अभिमानास्पद ठरली आहे. भारताची एकात्मता व अखंडतेसाठी बलिदान देणारे दिवंगत काँग्रेस नेते राजीव गांधी हे या विज्ञान व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात संगमनेर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, तरुणांचे आशास्थान असलेल्या राजीव गांधींनी त्यांना विधायक व रचनात्मक कार्यात प्रेरित करण्याचे महान कार्य केले. भारताला स्वयंपुर्ण व स्वावलंबी बनविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणाची जोड त्यांनी दिली. दिली पाहिजे. सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावण्यासाठी आपण सर्वांनी जाती, पंथ आणि धर्माच्या पलीकडे जावुन कार्य केले पाहिजे.

त्यांचे विचार अंमलात आणून समृध्द व विकसित देश निर्माण करण्यासाठी युवकांनी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, सुभाष सांगळे, अ‍ॅड.अशोक हजारे, प्रा.बाबा खरात आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajiv Gandhi was the father of the science and technology revolution