विखे पाटील-राम शिंदेंचे कर्जतच्या नेत्यामुळे मनोमीलन, रोहित पवारांना रोखण्याचा प्लॅन

Ram Shinde-Vikhe Patil together to stop Rohit Pawar
Ram Shinde-Vikhe Patil together to stop Rohit Pawar

नगर ः राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमध्ये आमदारकी जिंकली. आणि वर्षभरातच भाजपच्या ताब्यातील पंचायत समित्या, मार्केट कमिट्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा रोवला. जामखेड नगर परिषदेतही त्यांनी सत्तांतर घडवून आणले. बघता बघता भाजपचा बालेकिल्ला राष्ट्रवादीचा करून टाकला.

नवख्या रोहित पवारांनी भाजपचे दिग्गज मंत्री राम शिंदे यांचा पराभव केल्यानंतर ते राज्याच्या राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी आले. शिंदे मात्र वर्षभर फारसे सक्रिय दिसले नाही. उलट पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात त्यांनी जाहीरपणे टीका टिप्पणी सुरू केली. एवढेच नव्हे तर विखे पाटील कुटुंबामुळे जिल्ह्यात पक्षाची निवडणुकीत वाताहत झाल्याचा आरोपही केला. त्यामुळे दोघांत दरी निर्माण झाली. या वातावरणाचा रोहित पवारांनी फायदा घेत वर्षभरातच दोन्ही तालुक्यात जम बसवला.

जिल्हा परिषद, जिल्हा नियोजनातही त्यांचीच छाप दिसून आली. मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी, कर्जतची एमआयडीसी, जामखेडचे राज्य राखीव दलाचे केंद्र, हळगावचे कृषी महाविद्यालय पुन्हा खेचून आणले. अशा जमेच्या बाजू राहिल्या. आता पक्षाने त्यांच्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी टाकली आहे. आणि दुसरीकडे पुढच्याच महिन्यात कर्जत नगर परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. आणि पालिकेच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड घडली आहे. ही घडामोड केवळ कर्जत-जामखेड किंवा नगर जिल्ह्यापुरती मर्यादित नाही.

खासदार विखे पाटील आणि माजी मंत्री राम शिंदे यांचे मनोमीलन झाले आहे. कर्जत पालिकेने उभारलेल्या उद्यानाच्या उदघाटनाच्या निमित्ताने हे नेते एकत्र आले. एकमेकांना केक भरवित त्यांनी आपल्यात किती गोडी निर्माण झालीय हे दाखवून दिले.

आगामी कर्जत पालिका निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी रणनीतीही आखली आहे. कर्जत दौऱ्यात खासदार विखे पाटलांनी धडाकेबाज घोषणा करून टाकली. सर्व कर्जतकरांचा अपघाती विमा उतरविणार असल्याचेही त्यांनी जाहीर करून टाकले, तेही पदरखर्चाने. या घोषणेचा नक्कीच आगामी निवडणुकीत परिणाम होणार आहे.

राऊत यांनी घडविले मनोमीलन

कर्जत भाजपचे सर्वेसर्वा उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यासाठी ती लाभकारक ठरणार आहे. त्यांनी पालिकेच्या माध्यमातून भूमिगत गटार, अद्ययावत बगिचे उभारले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाण्याचा प्रश्न सोडविला आणि बगिचांमध्ये कारंजेही सुरू केले. यावरून पाणी किती मुबलक आहे, याची प्रचिती यावी. विखे आणि शिंदे यांचे मनोमीलन घडविण्यासाठी राऊत यांचीच भूमिका महत्त्वाची राहिली. त्यामुळे सध्या भाजपच्या गोटात फिल गुडचे वातावरण आहे.

कर्जतमध्ये काय आहे स्थिती
कर्जत पालिकेत भाजपचे वर्चस्व आहे. त्यांनी मागील निवडणुकीत बारा जागांवर विजय मिळवित आपण इथले सर्वेसर्वा असल्याचे दाखवून दिले होते. मितभाषी असल्याने लोकांना त्यांच्यापर्यंत पोहचण्यात कोणतीही अडचण येत नाही. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीला खातेही उघडता आलेले नव्हते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके वगळता दुसरा एकही स्थानिक नेता प्रभावी नाही. आगामी निवडणुकीच्या दृष्टीनेही तसा आश्वासक चेहरा कोणी दिसत नाही.

काँग्रेसची मदार घुले-साळुंकेंवर

शिवसेनेचीही अशीच हालत खस्ता आहे. काँग्रेसचे प्रवीण घुले आणि जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी पक्षाची ताकद टिकवून ठेवली आहे. गेल्या निवडणुकीत चार नगरसेवक त्यांनी निवडणूक आणले होते. त्यावेळी तत्कालीन मंत्री राम शिंदे यांच्याही प्रभावाचा भाजपला फायदा झाला. आता सर्वच फासे फिरले आहेत. आमदार पवार यांचे नेतृत्व मान्य करीत अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादी जवळ केली आहे. काही निवडणुकीपूर्वी उडी मारण्याच्या तयारी आहेत. पवार कोणत्याही वेळी वातावरण आपल्या बाजूने फिरवू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीला उभारी मिळू शकते.

राऊत-घुलेंभोवती राजकारण

कर्जतमध्ये आतापर्यंत राऊत विरूद्ध घुले असाच राजकीय संघर्ष झाला आहे. यंदा घुले यांना पवारांचे पाठबळ असणार आहे. त्या दोघांत विधानसभा निवडणुकीपासूनच चांगले ट्युनिंग आहे. त्याचा फायदा त्यांना नक्की होईल. ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जाणार असली तरी ती वाटते तेवढी सोपी नक्कीच नाही. आता तर विखे-शिंदे यांच्या मनोमीलनामुळे ती आणखीच बिकट बनली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पवारांच्या करिष्म्यावर अवलंबून आहेत. काहीही असले तरी कर्जत पालिकेची निवडणूकच आगामी राजकीय गणिते ठरविणार हे निश्चित.

भाजपचा निवडणूक प्लॅन
राष्ट्रवादीचे आमदार पवार यांचा विजयाचा वारू कर्जत पालिकेत थोपवून धरायचा असाच भाजपचा प्लॅन आहे. राष्ट्रवादी सत्तेपासून वंचित राहिली तर पवारांचे राजकीय वजन आपोआप घटेल, असाच भाजप नेत्यांचा मनसुबा आहे. दुसरीकडे पवारांनीही स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून शहरात होम टू होम पोहोचण्याचा प्रयत्न केला.

काटशहचे राजकारण

उद्यानाच्या उदघाटनाला लोकप्रतिनिधी म्हणून आमदार पवार यांना निमंत्रण देणे आवश्यक असताना मुद्दाम त्यांना या कार्यक्रमापासून बाजूला ठेवले. भाजपनेही काटशहचे राजकारण सुरू केले आहे. ते आगामी संघर्षाची नांदी ठरू शकते.

यंदा चौदा प्लस
कर्जतमध्ये पालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली आहेत. खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाणार आहे. त्यात आम्ही नक्कीच चौदा प्लस असे टार्गेट ठेवले आहे. विकासकामांच्या जोरावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. काय कामं केली ती कर्जतकरांना माहिती आहे, असे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत सांगतात.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com