भाजपात "राम" परतला...चौंडीत केला सरकारचा निषेध

वसंत सानप
शुक्रवार, 22 मे 2020

माजी मंत्री शिंदेही काहीसे नाराज होते. पराभवानंतर ते फारसे सक्रीय झाले नाहीत. आता पक्षाने तिकीट डावलले त्यामुळे पक्षाच्या आंदोलनात सहभागी होतात की नाही, अशी चर्चा होती.

जामखेड : विधान सभा निवडणूक ते विधान परिषद निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघातून बरेच पाणी वाहून गेले आहे. विधानसभेतील पराभवानंतर भाजप प्रा. राम शिंदे यांना आमदारकीची संधी देईल असे वाटत होते. परंतु ते साफ खोटे ठरले. त्यामुळे माजी मंत्री शिंदेही काहीसे नाराज होते. पराभवानंतर ते फारसे सक्रीय झाले नाहीत. आता पक्षाने तिकीट डावलले त्यामुळे पक्षाच्या आंदोलनात सहभागी होतात की नाही, अशी चर्चा होती.

जामखेड तालुक्यातील चौंडी या निवासस्थानी आज वेगळाच नजारा होता. ''महाराष्ट्र बचाव''  आंदोलनात नाराज झालेल्या माजी मंत्री शिंदे यांनी कुटुंबीयांसह सहभाग नोंदविला. आणि सर्वांचीच बोलती 'बंद' केली. कार्यकर्तेही खूश झाले आहेत. नगर भाजपात राम परतला, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे, अशा प्रकारच्या पोस्ट टाकून सोशल मीडियातून विरोधकांना इशारा देत आहेत.

या आंदोलनात शिंदे यांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई, चिरंजीव अजिंक्य यांच्यासह सहभाग होता. हे अंदोलन चौंडीतील  माजीमंत्री शिंदेंच्या निवासस्थासमोर झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सरकार निष्क्रीय ठरले म्हणून महाराष्ट्र बचाओ,शेतकरी, बारा बलुतेदार, असंघटित कामगारांना पन्नास हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करा आणि महाराष्ट्र वाचवा अशा आशयाचे फलक  दाखवून, कपाळाला निषेध नोंदविणार्या पट्ट्या लावून या सरकारच्या कार्यपध्दतीचा निषेध केला.

याबाबत अधिक माहिती अशी, आज झालेल्या  अंदोलना संदर्भात कार्यकर्त्यांनी चार दिवसांपूर्वी जामखेड तहसीलदार कार्यालयाला  निवेदन दिले होते. त्यावेळी माजी मंत्री राम शिंदे कुठे दिसले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष अंदोलनात ते सहभागी होतील का ? हा प्रश्न अनुउत्तरीत होता.

हेही वाचा - प्रशासनाच्या चलता है..भूमिकेमुळेच कर्जतला कोरोनाचा शिरकाव

विधान परिषदेच्या निवडणूकीनंतर 'भाजप' चे हे राज्यव्यापी पहिलेच आंदोलन होते, त्या निवडणूकीत माजीमंत्री शिंदे यांची वर्णी लागणार असे अखेरच्या क्षणापर्यंत चित्र होते. मात्र, राजकारणाच्या सारीपाटावर शह-कटशहाचे राजकारण झाले आणि हाता-तोंडाशी आलेली 'आमदारकी'  दूर गेली.माजी मंत्री शिंदेंना डावल्याने होणाऱ्या या पहिल्या अंदोलानाच्या निमित्ताने माजी मंत्री शिंदे नेमकी कोणती भूमिका घेतात? याकडे सर्वांचेच विशेष लक्ष होते. 
पक्षाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले म्हणून राज्यभर पुकारलेल्या महाराष्ट्रात बचाव आंदोलनात माजी मंत्री शिंदे यांनी कुटुंबीयांसह सहभाग नोंदवला.

झाले गेले विसरून जावे, पुढे-पुढे चालावे हा मंत्र जपला आणि चोंडी येथील घरासमोर आंदोलन करुन पक्षात सक्रीय असल्याचे दाखवून दिले. यावेळी पांडुरंग उबाळे, सरपंच अभिमन्यु सोनवणे, चेअरमन विलास जगदाळे आदींसह कार्यकर्ते उपस्थितीत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram Shinde's agitation against the government