esakal | या सालगड्याचा मुलगा असा झाला मंत्री...आता देह झाला चंदनाचा

बोलून बातमी शोधा

shankar shinde chondi 22.jpg

वडीलोपार्जीत कोरडवाहू क्षेत्र, अठरा विश्व दारिद्र्य पाचवीला पुंजलेले. आयुष्यभर कष्ट सोसले. वयाच्या अठराव्या वर्षापासूनच वयाचे वयाचे अर्धशतक ओलांडेपर्यंत भाऊंच्या हातच काम सुटलं नाही.

या सालगड्याचा मुलगा असा झाला मंत्री...आता देह झाला चंदनाचा
sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड ः पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर यांचे नाव देशभरात आदराने घेतले जाते. पेशवेकाळात करारी बाणा दाखवणारी ही राज्यकर्ती स्त्री सर्व क्षेत्रातील अभ्यासकांचे लक्ष वेधून घेते. महाराष्ट्रच नव्हे तर उत्तर हिंदुस्थानात आजही त्यांच्या राज्यकारभाराच्या स्मृती जागवल्या जातात. त्याच्याच माहेरकडील शिंदे कुटुंबातील तरूण रामदास ऊर्फ प्राध्यापक बनतो. 

पुढे राजकारणात प्रवेश करून आमदार, नंतर मंत्रीही बनतो. सर्व अभ्यासक, राजकीय विश्लेषकांना तो तोंडात बोटं घालायला लावतो. काहींना वाटतं हा अहल्याबाईंच्या घरातील आहे म्हटल्यावर तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आला असेल. परंतु परिस्थिती काही अौरच आहे.

माजी मंत्री शिंदे हे एका गरीब कुटुंबात जन्माला आले. भले अहल्याबाईंचा वारसा असेल परंतु श्रीमंती काही वारसाहक्काने मिळाली नाही. मंत्री शिंदे यांचे वडील शंकरराव बापू शिंदे यांनी अर्धे आयुष्यात मोलमजुरीत घालवले. पुढे मुलगा शिकला, प्राध्यापक झाला, राजकारणात उतरून मंत्रीही झाला. त्यामुळे शंकररराव यांना सोन्याचे दिवस आले. गाडी, बंगला, नोकर, चाकर असं सर्व काही मुलाने दिमतीला आणलं. सर्वकाही सुरळीत चालू असताना आजारपणाने त्यांना घेरलं. वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी शंकरराव ऊर्फ भाऊ यांनी या जगाचा निरोप घेतला.

हेही वाचा - प्रा. राम शिंदे झाले भाजपचे उपाध्यक्ष

मृत्युसमयी देखील त्यांना मुलाच्या राजकीय उंचीचा वाढता आलेख अनुभवास मिळाला. प्रा. राम शिंदे यांची दोन दिवसांपूर्वीच भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा झाली होती.

साल घालून कुटुंबाचा गाडा ओढला

वडीलोपार्जीत अल्पभुधारक कोरडवाहू क्षेत्र, अठरा विश्व दारिद्र्य पाचवीला पुंजलेले. आयुष्यभर कष्ट सोसले. वयाच्या अठराव्या वर्षापासूनच वयाचे वयाचे अर्धशतक ओलांडेपर्यंत भाऊंच्या हातच काम सुटलं नाही. त्यांना पत्नी भामाबाई शिंदे ऊर्फ बाईची खंबीर साथ मिळाली. भाऊंनी गावातच शिंदे पाटलांच्या घरी वीस-पंचवीस वर्ष साल घातलं ; आपल्या मेहनतीच्या जीवावर तिन्ही मुलीचा संसार उभा केला. चौथा मुलगा उच्च पदवीधर केला.  

थोरली मुलगी साखरबाई हिचा विवाह पोतरा (ता. करमाळा जि.सोलापूर) येथील शेतकरी कुटुंबातील आजिनाथ भांड यांच्याशी झाला. दुसरी मुलगी शोभाताई हिचा विवाह वीर निमगाव (ता. अकलूज जि. सोलापूर) येथील शेतकरी कुटुंबातील गणपती देवढे यांच्याशी केला. तर धाकटी मुलगी ताई पोतरा (ता. करमाळा जि. सोलापूर) रवी भांड यांना दिली.
मुलगा राम एम.एस.सी.बी. एड. झाला. त्याने रोजगाराच्या वाटा शोधण्यास सुरुवात केली. तिथेच भाऊंच्या हातच काम सुटलं.

लगीनगाठ 

मुलगा राम पुढे प्राध्यापक  झाला. त्यांचेही दोनाचे चार हात झाले . धनगर जवळका (ता.पाटोदा,जि.बीड) येथील काळे यांच्या कुटुंबातील रामराव काळे यांची कन्या आशा हिच्याशी राम यांचा विवाह झाला. विवाहानंतर काही दिवस त्यांनी जनता शिक्षण प्रसारक मंडळ, आष्टी जि.बीड या शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून नोकरी केली. मात्र, नोकरीमध्ये ते फारसे रमले नाहीत. 

या दरम्यान त्यांची भेट माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्याशी झाली. शिंदे -डांगेंचे सूत जुळले. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थाळाचा विकास करण्यासाठी युती शासनाने हाती घेतलेल्या चौंडी विकास प्रकल्पा अंतर्गत सुरु असलेल्या कामांवर पूर्ण वेळ लक्ष देण्यासाठी डांगेंच्या सांगण्यावरुन राम यांनी नोकरी सोडली. हा त्यांचा निर्णय फार धाडसाचा होता. मात्र, येथेच त्यांच्या आणि कुटुबांच्या जीवनाला वळण मिळाले.
 

चौंडीचे सरपंच झाले

राम यांचा भाजपाच्या सक्रीय राजकारणात प्रवेश झाला. पुढे काही दिवसानंतर राम गावचे सरपंच झाले आणि त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर निरनिराळ्या पदांवर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. संघटनेत कार्यकर्ता, तालुकाध्यक्षापासून त्यांनी राज्य पातळीवर काम केले. मोठ्या तपश्चर्येने पुढे त्यांच्या सौभाग्यवती आशाताई या पंचायत समितीच्या निवडणूकीत निवडून आल्या आणि सभापती झाल्या. त्यांचा सभापती पदाचा कार्यकाळ संपत असतानाच कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ खुला झाला.

विधानसभेत झाला प्रवेश 
 
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ खुला झाला. खुल्या मतदारसंघातील पहिला आमदार होण्याचे भाग्य प्रा. राम शिंदे यांना मिळाले. पहिली पाच वर्षे राज्यात आघाडीचे सरकार होतं .त्यामुळे विरोधी पक्षाचा आमदार म्हणून राम शिंदे यांनी आपल्या कामाचा ठसा आणि ओळख निर्माण केली. 

दुसऱ्यांदा थेट मंत्रीपदच

राम शिंदे दुसर्‍यांदा आमदार झाले. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले. राम शिंदेंना मंत्रिपदाची संधी मिळाली. राज्यात वजनदार मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. राम शिंदे यांचा राजकीय आलेख उंचावत गेला. तसे त्यांचे वडील शंकर भाऊ यांना सुखाचे दिवस आले. त्यांच काम सुटलं. हाताखाली नोकरचाकर आले. हिंडायला फिरायला चारचाकी गाडी मिळाली. राहायला बंगला मिळाला.सर्व काही सुखसुविधा पायाशी खेळत असताना नियतीने एक डाव टाकला. शंकर भाऊंनी वयाच्या ऐंशी ओलांडली नि आजाराने डोके वर काढले. शनिवारी (ता.04) रोजी नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना भाऊंनी या जगाचा निरोप घेतला.

हे होते अंत्यविधीस

अंत्यविधीस खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार रोहित पवार, माजी आमदार भीमराव धोंडे, कैलास वाघचौरे, अरुण मुंडे, भानुदास बेरड, अजय काशीद, रवी सुरवसे व वारकरी संप्रादयातील महंत यांच्यासह राजकारणातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. 

मंत्री झाल्यानंतरही राम शिंदे यांनी कधीच आपली गरिबी लपवली नाही. मी सालगड्याचा मुलगा अल्याचे ते अभिमानाने सांगत. काल त्यांच्यावर दुःखाचा प्रसंग अोढावला. कारण वडील गेल्याने ते पोरके झाले आहेत. या पुढे असतील केवळ त्यांच्या स्मृती.