ऊसाच्या रसवंतीगृहाला 'कोरोना'चे ग्रहण; एक हजार कामगार व दिडशे बैल बेकार 

विनायक दरंदले
Wednesday, 23 December 2020

सोनई ते राहुरी या २० किलोमीटरवर तब्बल दिडशे रसवंतीगृह असून आठ महिन्यापासून लाकडी चरख्यांचा फेरा साडेसातीच्या फेऱ्यात अडकला आहे.

सोनई (अहमदनगर) : सोनई ते राहुरी या २० किलोमीटरवर तब्बल दिडशे रसवंतीगृह असून आठ महिन्यापासून लाकडी चरख्यांचा फेरा साडेसातीच्या फेऱ्यात अडकला आहे. शेतक-यांवर रसवंतीचा ऊस चारा म्हणून विकण्याची वेळ आली आहे.

शनिशिंगणापुरला येणाऱ्या भाविकांना गृहीत धरुन सोनई- राहुरी या रस्त्यावर दिडशे रसवंतीगृह आहेत. सर्व रसवंतीवर रोज ऐंशी टन उस गाळला जात होता. वंजारवाडी, ब्राम्हणी, उंबरे, अवघडपिंप्री, गोटुंबाआखाडा व शिंगणापुर फाटा येथे रस्त्याच्या कडेला शेतक-यांनी टाकलेल्या उसाच्या चरखातून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत होती. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनाचा लाॅकडाऊन आणि आता शनिदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कमी संख्यामुळे निम्म्याहून अधिक रसवंतीचे चाक बंद पडले आहे. रसवंतीगृहावर कामास असलेले एक हजार कामगार व चरख्याला जुपलेले दिडशे बैल बेकार झाले आहेत. उसाच्या रसाबरोबरच शेतकरी कौठ, नारळपाणी, सेंद्रिय गुळ व कडधान्य विकत होते. शिर्डी- शनिशिंगणापुर मार्गावर तीनशेहून अधिक प्रवासी वाहतूक करणारे वाहने अर्थपुर्ण जुगाड मुळे रसवंतीगृहावर थांबत होते. हे वाहने सध्या पुर्णपणे बंद असल्याचे रसवंती चालक अडचणीत सापडले आहेत.

शनिदर्शनाला रोज तीस ते चाळीस हजार तर शनिवार व रविवार या दिवशी एक लाखांच्या दरम्यान भाविक येत होते. रसवंती, हाॅटेल व इतर व्यावसायाने रस्त्यावरील गावांचा आर्थिकस्तर उंचावलेला होता.सध्या अजिबातच गर्दी नसल्याने चरख ओढणा-या बैलाच्या गळ्यातील घुंगराचा खळखळाट बंद होवून रस्त्यावरील गर्दीचे वैभव जावून रस्त्याला अवकाळा आल्याचे चित्र आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raswanti Gruha on Sonai to Rahuri road closed