esakal | दुष्काळी कामासाठी केली ‘या’ धरणाची निर्मिती... मंत्र्यांनी का केला होता कार्यक्रम रद्द जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

The Read story of construction of Nimgaon Gangarda Seena dam in Karjat taluka

अहमदनगरसह सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वाची म्हणून सीना नदीकडे पाहिले जाते. या नदीचा उगम नगरजवळ ससेवाडी येथे आहे. मात्र, अपवाद वगळता ही नदी कायम कोरडी राहत आहे. या नदीवर कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथे सीना व सोलापूर- उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीत कोळगाव ही दोन धरणे आहेत. ही धरणे झाल्यापासून फक्त काही वेळा भरली आहेत.

दुष्काळी कामासाठी केली ‘या’ धरणाची निर्मिती... मंत्र्यांनी का केला होता कार्यक्रम रद्द जाणून घ्या

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : अहमदनगरसह सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वाची म्हणून सीना नदीकडे पाहिले जाते. या नदीचा उगम नगरजवळ ससेवाडी येथे आहे. मात्र, अपवाद वगळता ही नदी कायम कोरडी राहत आहे. या नदीवर कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथे सीना व सोलापूर- उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीत कोळगाव ही दोन धरणे आहेत. ही धरणे झाल्यापासून फक्त काही वेळा भरली आहेत. त्यामुळे धरणे होऊन सुद्धा शेतीसाठी पाहिजे तसा उपयोग झालेला नाही. मात्र, यंदा प्रथमच निमगाव गांगर्डा धरण जुलैमध्ये ५१ टक्केपेक्षा जास्त भरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीप्रमाणात समाधान व्यक्त केले जात आहे. तर कोळगाव धरणात मात्र अद्याप समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही.

कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा हे धरण झाल्यापासून २०१० मध्ये प्रथम ओव्होरफ्लो झाले. त्यानंतर सात वर्षाने म्हणजे २०१७ मध्ये कुकडीच्या पाण्याचा ५० टक्के साठा व उर्वरीत पावसाच्या पाण्याने ओव्हरफ्लो झाले. मात्र यावर्षी जुनमध्ये चांगला पाऊस झाल्याने जुलैमध्येच धरण ५० टक्केच्या पुढे गेल्याने धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. हे धरण ओव्हरफ्लो झाले तर सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कोळगाव धरण भरण्यासाठी उपयोग होतो. कोळगाव धरण भरण्यासाठी जामखेड तालुक्यातून व परांडा तालुक्यातून येणाऱ्या उपनद्या असल्या तरी निमगाव गांगर्डीपासून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह जास्त दिवस राहतो. असा समज या भागात आहे. त्यामुळे सीना धरण ५० टक्केच्यापुढे गेले असल्याने या भागातील शेतकऱ्यांचे डोळे सीना धरणाकडे लागले आहेत. 


कायम दुष्काळी व जिरायती भागाला वरदान ठरलेल्या सिना धरणाची पाणी साठवण क्षमता २४०० द.ल.घ.फू. असुन मृतसाठा ५५२ द.ल.घ.फू. आहे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी कुकडी आवर्तनातून भोसा खिंडीद्वारे पाणी सोडण्यात आले होते. यावेळी धरणामध्ये अवघे ३८ द.ल.घ.फू. पाण्याची आवक आली होती. यापूर्वी सिना आणि कोळगाव धरणात परतीच्या पावसाच्या पाण्याची आवक आल्याचा इतिहास आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
एडीसीसी बँकेचे माजी संचालक राजेंद्र निंबाळकर म्हणाले, सिना नदीवरील निमगाव गांगर्डी धरण हे कोळगावच्या आधी झालेले आहे. आबासाहेब निंबाळकर तेव्हा आमदार होते. या धरणाची पाणी साठवण क्षमता कमी असल्याने एकच कॅनॉल झाला. दिघीच्या परिसरात त्याचा टेल टॅक होणार होता. नंतर मराठवाड्यातील लोकांनी पाण्याची मागणी केली. हे धरण झाल्यापासून खूप कमी वेळा भरले आहे. लिफ्ट करुन कॅनॉलने पाणी द्याचे असा प्रकल्प येथे होणार होता. तेव्हा मंत्री शिवाजी पाटील निलंगेकर यांनी त्याला मंजूरीही दिली होती. या धरणासाठी आबासाहेब पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याकडे आग्रह धरला होता. आणि त्याला त्यांनी मंजूरी दिली होती. या धरणाला चव्हाण यांनी भेटही दिली होती. या धरणाचे कॅचमेंट क्षेत्र कमी आहे. त्यामुळे जास्त पाणी येत नाही. तरीही येथील दुष्काळी भागाला हे धरण आठमाही वरदायीनी ठरले आहे. आजही या धरणातून हंगामात पाणी सोडले जाते. पण पुर्ण क्षमतेने ते जात नाही. त्याच्यात कायम पाणी रहावे म्हणून भोसा खिंडमधून कुकडीच्या प्रकल्पातून पाणी येणे आवश्‍यक आहे. तसे पाणी यावर्षी आले होते. मात्र, ते पाणी कायम येणे आवश्‍यक आहे. बऱ्याच गावाच्या पाणी पुरवठा योजना या धरणावर अवलंबून आहेत. धरणात पाणी येत नसल्याने अनेकदा करमाळा तालुक्यातील मांगी तालुक्यातून टँकरने पाणी आणले जाते. मात्र, या धरणात कायम पाणी दिले तर प्रश्‍न सुटेल. गांगर्डी धरणावर शरद पवार यांनीही भेट दिलेली आहे. 
पत्रकार निलेश दिवटे म्हणाले, सीना धरणात स्थापनेपासून प्रथमच यंदा जुलैमध्ये निम्म्यापेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. मागील काही दिवसापासून सीना नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे येथील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा आणखीन पल्लवित झाल्या आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सीना धरण पाणलोट क्षेत्राची परिस्थिती पाहता कुकडी आवर्तनातून भोसा खिंडीद्वारे अवघे दोन दिवस पाणी सोडण्यात आले होते. यावेळी धरणामध्ये अवघे ३८ दलघफू पाण्याची आवक आली होती. आज सध्याचा पाणीसाठा १२५१ द.ल.घ.फू आहे. 

मिरगजगाव येथील सीना प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी बाजीराव थोरात म्हणाले, तालुक्यातील मागील पावसाची आकडेवारी तपासली असता परतीच्या पावसानेच धरणात पाणीसाठा आला आहे. मात्र या वर्षी सुरुवातीला जुलै महिन्यातच धरण निम्मे भरल्याने चांगले संकेत आहेत.

अशी झाली होती धरणाची निर्मीती
सीना धरणाचा श्रीगोंदा, कर्जत व आष्टी तालुक्यातील काही गावांसाठी उपयोग होतो. या धरणाची संकल्पना माजी पाटबंधारे मंत्री ए.बु. उर्फ आबासाहेब निंबाळकर यांनी मांडली होती. या धरणावर १८ गावाच्या पाणी योजना आहेत. कुकडीच्या धरणातून भोसाखिंडद्‌वारे येथे पाणी सोडण्यात यावे, आशी मागणी या भागातील नागरिकांची आहे. यंदा तसं पाणी सोडण्यातही आलं आलं. १९७२ ला महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. तेव्हा नागरिकांच्या हाताला काम मिळावे म्हणून हे धरण करण्यात आलं असल्याचे सांगितले जाते. दुष्काळामुळे तेव्हा अनेकजण ऊस तोडण्यासाठी बाहेर जिल्ह्यात जात होते. तेव्हा १९७२ ला माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांच्या हस्ते या धरणाचे भूमीपूजन झाले. मात्र, पुन्हा काही वर्ष काम बंद पडले आणि त्यानंतर १९७६ ला चांगल्या पद्धतीने काम सुरु झाले. १९७६ मध्ये यासाठी भूसंपादन झाले. १९७७- ७८ ला येथील शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून लढा उभारला गेला. या भागात नागरिकांनी आंदोलन केली, त्यात अनेकांना तुरुंगातही टाकण्यात आले होते. याची माहिती देणारे ‘आम्ही थिटेसांगवीकर’ या पेजवर व्हिडीओ आहेत. १९८४ मध्ये या धरणासाठी नदी बंद करायचा कार्यक्रम ठरला. तेव्हा नदी बंद करण्याची पूजा झाली. तेव्हा प्रश्‍न सुटावेत म्हणून आंदोलन करण्यात आले. १९८४ मध्ये सीना नदी येथे आडवण्यात आली. त्यानंतर कॅनेलमध्ये पाणी सोडण्याचा कार्यक्रम ठरला होता. कार्यक्रमासाठी मंडप टाकण्यात आला होता. तेव्हा प्रश्‍न सुटावेत म्हणून आंदोलन झाले. त्याची दखल घेत हा पाणी सोडण्याचा कार्यक्रम रद्द केला. तेव्हा आंदोलनकर्त्यांना तेव्हा आबासाहेब निंबाळकर यांनी बोलावून घेतले आणि प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन देऊन प्रश्‍न सोडवण्यासाठी काही कार्यकर्त्यांना मुंबईला घेऊन गेले, असं या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे. या आधी भोसा खिंडीतून आलेल्या पाण्याची आणि धरणाची भेट सुद्धा झाली नाही असं यात म्हटलं आहे.
संपादन : अशोक मुरुमकर