सर्वत्र कांदा टंचाई असताना पारनेरमध्ये कांदाच कांदा

मार्तंड बुचुडे
Thursday, 17 December 2020

मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. अवकाळी पाऊस झाला, तर कांदा खराब होण्याची भीती आहे. तसेच सध्या बाजारात लाल कांदा येत असून, तो फार काळ टिकत नाही.

पारनेर ः जिल्ह्यात सर्वत्र कांद्याची वानवा आहे. त्यामुळे भावात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांकडील कांदा अतिवृष्टीने वाया गेल्याने ही टंचाई निर्माण झाली आहे. परंतु बाजार समितीत आज सुमारे 53 हजार कांदागोण्यांची आवक झाली.

या वर्षी प्रथमच एका दिवसात इतक्‍या मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली. कांद्याची आवक वाढली असली, तरी गत आठवड्यातील भाव आजच्या बाजारभावात फारसा फरक झाला नाही. आजही चांगल्या कांद्यास 30 ते 35 रुपये किलो भाव मिळाला. 

हेही वाचा - एकदाच लागवड खर्च, नंतर फक्त नोटा छापायच्या

पारनेरचा कांदा अनेक राज्यांत भाव खातो. परिणामी, येथील बाजार समितीत कांद्याला चांगला दर मिळतो. बाजार समितीत आज सुमारे 53 हजार कांदागोण्यांची आवक झाली. मंगळवारी (ता.15) दुपारपासूनच कांद्याची आवक सुरू झाली होती. काल सायंकाळी तर बाजार समितीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेकवेळा वाहतूककोंडी झाली. 

मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. अवकाळी पाऊस झाला, तर कांदा खराब होण्याची भीती आहे. तसेच सध्या बाजारात लाल कांदा येत असून, तो फार काळ टिकत नाही. कांदा खराब होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी कांदा विकण्याची घाई केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Record inflow of onions in Parner during scarcity