पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील बनावट लाभार्थ्यांकडून वसुली

विलास कुलकर्णी
Thursday, 29 October 2020

छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली. त्याद्वारे लाभार्थी शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात.

राहुरी : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या तालुक्‍यातील लाभार्थींची पडताळणी सुरू झाली आहे. योजनेच्या निकषांनुसार करदात्या 1124 शेतकऱ्यांकडून एक कोटी चार लाख 16 हजार रुपये; तसेच अपात्र 403 शेतकऱ्यांकडून 28 लाख 18 हजार रुपये, अशी एकूण एक कोटी 32 लाख 34 हजार रुपये रक्कम वसूल करण्यात येत आहे. 

छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली. त्याद्वारे लाभार्थी शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात.

ही रक्कम तीन टप्प्यांत संबंधित शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात जमा होते. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. योजना जाहीर होतानाच तिचे निकष जाहीर झाले. मात्र, योजनेस अपात्र असतानाही अनेकांनी नोंदणी केली. अशा लाभार्थींच्या खात्यांवर शासनाकडून रक्कम जमा होण्यास सुरवात झाली. मात्र, योजनेत बोगस अनेक लाभार्थी घुसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यावर, संबंधितांचा शोध सुरू झाला. 

करदाते, शासकीय नोकरीत असणाऱ्या कुटुंबातील सदस्य, शेती करण्यायोग्य असूनही शेतीचा वापर अन्य कारणांसाठी करणारे शेतकरी योजनेच्या निकषांत बसत नाहीत. प्रशासनातर्फे विविध बॅंकांमधून लाभधारक शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. लाभार्थींची पडताळणी करून, अपात्र लाभार्थींना योजनेतून हटविण्यात येत आहे.

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग झालेले पैसेही परत घेतले जात आहेत. त्यासाठी, विशेष वसुली पथके नियुक्त करून मोहीम हाती घेण्यात आली आहे. वसूल केलेली रक्कम भरण्यासाठी एक स्वतंत्र बॅंक खाते उघडले आहे. ऑक्‍टोबरअखेरपर्यंत वसुलीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 

राहुरीतील परिस्थिती 
लाभधारक शेतकरी : 44,507 
करदाते : 1,124 
वसुलीची रक्कम : 1,04,16,000 
अपात्र शेतकरी : 403 
वसुलीची रक्कम : 28,18,000 

पंतप्रधान सन्मान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. अशा अपात्र शेतकऱ्यांनी लाभाची रक्कम शासनाकडे परत जमा करण्यासाठी सहकार्य करावे. 
- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी , अहमदनगर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recovered from fake beneficiaries of PM Shetkari Sanman Yojana