साहेब आम्हाला रोजगार नाही जर हा व्यवसाय बंद झाला तर पुणे जिल्ह्यात स्थलांतर करावे लागेल

शांताराम काळे
Friday, 27 November 2020

हरिश्चंद्र गडावर स्थानिक आदिवासी व व्यवसायिकांनी मंदिर परिसरात कुडाच्या भिंती व पत्रे टाकून दुकाने थाटली होती.

अकोले (अहमदनगर) : हरिश्चंद्र गडावर स्थानिक आदिवासी व व्यवसायिकांनी मंदिर परिसरात कुडाच्या भिंती व पत्रे टाकून दुकाने थाटली होती. मात्र स्थानिक प्रशासन व वनविभागाने हे अतिक्रमण काढून टाकली आहेत. त्यामुळे मंदिराने मोकळा श्वास घेतला आहे.

मात्र आम्हाला रोजगारासाठी पुन्हा नारायणगाव येथे जावे लागेल  त्याऐवजी मंदिरापासून लांब स्वतंत्र जागा द्या, आम्ही आमचा व्यवसाय तिथे करू त्यावर स्थानिक कमिटी व वनविभाग याबाबत सकारात्मक विचार करणार असल्याचे समजते. 

नव्यानेच बदलून आलेले सहायक वन संरक्षक गणेश रणदिवे यांनी गेल्या आठवड्यात हरिश्चंद्र गडावर फेर फटका मारला.  मंदिर परिसरात चाळीस व्यवसायिकांनी आपली दुकाने थाटली होती. त्यामुळे मंदिर परिसरात प्लास्टिक व कचरा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. त्यांनी तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी डी. डी. पडवळ सरपंच घोगरे, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व व्यवसायिक यांना बोलावून बैठक घेऊन मंदिर परिसरात दुकाने ठेवता येणार नाही. त्याऐवजी गडाच्या खाली पर्यायी जागा उपलब्ध करून आपणास व्यवसाय करता येईल. यावेळी व्यवसायिकांनी साहेब आम्हाला रोजगार नाही जर हा व्यवसाय बंद झाला तर पुणे जिल्ह्यात स्थलांतर करावे लागेल, असं सांगितले. 

यावर एकमत होऊन गडाच्या खाली जागा देऊन हे अतिक्रमण तातडीने काढण्यात आले. वनविभागाच्या कर्मचारी यांनी चाळीस दुकाने मंदिर परिसरातून हटविले आहेत. मात्र ग्रामस्थ,व्यवसायिक,अधिकारी यांच्या समन्वयाने हे काम करण्यात आले.
सहायक वन संरक्षक गणेश रणदिवे म्हणाले, हरिश्चंद्र गडावर मंदिर परिसरात चाळीस दुकाने थाटले होते.

मात्र आम्ही याबाबत व्यवसायिक व ग्रामस्थ यांची बैठक घेऊन हे कसे अयोग्य आहे हे पटवून दिले तसेच व्यवसायिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मंदिरापासून खाली दहा बाय दहा ची मागणी स्वीकारून गडाखाली व्यवसायासाठी मदत करणार आहोत. मात्र हा प्रश्न नव्याने तयार होऊ नये म्हणून अतिक्रमण काढले आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Removed encroachments on Harishchandra fort in Akole taluka