सीना नदीवरील बंधाऱ्याची अनोळखीने काढली दारे; त्वरीत लक्ष न दिल्यासे बंधारा रिकाम होण्याचा धोका

अशोक मुरुमकर/अण्णा काळे
Sunday, 22 November 2020

सीना नदीवरील करमाळा तालुक्यातील तरटगाव बंधाऱ्याची शनिवारी (ता. २२) मध्यरात्री अनोळखी व्यक्तीने दारे काढली आहेत.

अहमदनगर : सीना नदीवरील करमाळा तालुक्यातील तरटगाव बंधाऱ्याची शनिवारी (ता. २२) मध्यरात्री अनोळखी व्यक्तीने दारे काढली आहेत. त्यामुळे बंधारा खाली होण्याची शक्यता निर्माण झाली असून जास्त पाणी गेल्यास खालचा बंधारा फुटण्याचाही धोका निर्माण झाला आहे. येथे त्वरीत सुरक्षारक्षक देऊन बंधार्याचे दार बसवावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

तरटगाव बंधारा भरल्यास सोलापूर व नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होतो. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने सीना नदी जुलैपासूनच पाण्याने वाहत आहे. सरकारच्या नियमानुसार बंधाऱ्याची दारेही टाकली होती. सध्या बंधाऱ्यामध्ये आठ दारे भरली आहेत. नववे दारही टाकले होते. त्यामुळे नदीच्या बाजूला असलेल्या शेतीत पाणी जाते. मात्र, बंधारा पूर्ण क्षमतेने भरला तर उन्हाळ्यातही पाणी राहते. मात्र, मंगळवारी रात्री बंधाऱ्याचे नवव्या दारातील पाच दारे अनोळखीने काढली आहेत. त्यामुळे बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी खाली जात आहे. सकाळी काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काही दारे पुन्हा टाकली आहेत, असे तरटगावचे सरपंच डॉ. अमोल घाडगे यांनी सांगितले. मात्र, एक दरवाजा बसवायचा राहिलेला आहे. दारे कोणी काढली याची त्वरीत चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

सीना नदीवर दिघी, खडकी, तरटगाव, पोटेगाव व संगोबा येथे कोल्हापुरी पद्धतीने लघु पाटबंधारे आहेत. यातील पोटेगावचा बंधारा फक्त नावाला आहे. संगोबाच्या बंधाऱ्याचे पाणी तरटगावच्या बंधाऱ्यापर्यंत आले आहे. या बंधाऱ्यातून व तरटगावच्या बंधाऱ्यातून मोठ्याप्रमाणात पाण्याची गळती होती आहे. याकडे पाटबंधारे विभाग दूर्लक्ष करत आहे. बंधाऱ्याची गळती वेळीच काढली नाही तर लवकरच बंधारे रिकामे होतील. 

शशिकांत नरुटे म्हणाले, यावर्षी बंधाऱ्यात चांगले पाणी आहे. मात्र, पाटबंधारे विभाग सहकार्य करत नाही. नियमानुसार बंधाऱ्याची दारेही टाकली नसल्याने मोठ्याप्रमाणात गळती होत आहे. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. सध्या वरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे काही वाटत नाही, मात्र, दरवर्षीच्या अनुभवानुसार गळती काढली नाही तर बंधाऱ्या रिकामा होण्याचा धोका आहे. नदीकाटचे शेतकरी एकत्र येऊन पाणी राहावे म्हणून लोकवगर्णी करुन कागद टाकतात. यासाठी येथील मच्छिमार जीव धोक्यात घालतात. त्यांना पाटबंधारे विभागाने सहकार्य करण्याची गरज आहे.

पाटबंधारे विभागाचे अधिकारी श्री इंगळे म्हणाले, तरटगाव बंधाऱ्याचे दार कोणी काढले हे माहित नाही. याबाबत अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करणार आहोत. मनुष्यबाळ कमी आहे. बंधाऱ्याला नऊ दारे टाकून दिली आहेत. वरुन येणाऱ्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने गळती काढता येत नाही. पाणी कमी झाल्याबरोबर गळती काढण्यात येईल.

करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे म्हणाले, शेतकऱ्यांच्या दृष्टीने बंधाऱ्याचे पाणी महत्त्वाचे आहे. काही शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. त्यांना पोलिस पूर्ण सहकार्य करतील याबरोबर बंधाऱ्याचे रक्षण व्हावे म्हणून या भागातील कोविड वॉरियर्स आणि ग्रामसुरक्षा दलाचे कार्यकर्ते यांनाही बंधाऱ्यातील पाण्याची सुरक्षा करण्यासाठी सूचना दिल्या जातील. याबरोबर कोणी दारे काढली आहेत. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. 

प्रफुल मुरुमकर म्हणाले, बंधारा भरला तर उन्हाळ्यात पाणी राहते. नऊ दारे भरली तरी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होते. मात्र, तरी हे नुकसान शेतकरी सहन करतात. परंतु हे दरवाजे काढल्याने मोठे नुकसान झाले. याची चौकशी करुन कारवाई करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Removed gates of Taratgaon dam in Karmala taluka