जामखेडला जिल्हा परिषद गटांची पुनर्रचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जामखेड

जामखेडला जिल्हा परिषद गटांची पुनर्रचना?

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड : मागील निवडणुकीत जामखेड तालुक्यात केवळ दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गण करण्यात आले होते. १६५ मते कमी पडताहेत म्हणून तालुक्यातील एक गट व दोन गण कमी झाल्याचे जिल्हा निवडणूक विभागाकडून सांगितले गेले होते. मात्र, या पाच वर्षांत कमी पडलेल्या आकडेवारीपेक्षा अधिक मतदार नोंदणी झाली आहे. जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती गणांची फेररचना करून पूर्वीप्रमाणे तीन गट व सहा गण निर्माण होतील, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रेय वारे यांनी पुढाकार घेतला आहे. प्रशासनाकडे तसेच आमदार रोहित पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रेय वारे हे स्थानिक स्वराज्य संस्थेतील अभ्यासू नेतृत्व; त्यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत तब्बल पंचवीस वर्षे प्रतिनिधित्व केले आहे.

हेही वाचा: कोल्हापूर : करवीर तहसीलदारांचा पार्सवर्ड कार्यालयाबाहेरील लोकांकडे

तालुक्यातील एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती गण कमी करून येथील जनतेवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. गट व गण कमी झाल्याने शासनस्तरावर गट व गणनिहाय मिळणाऱ्या सेवासवलतींपासून नागरिकांना वंचित राहावे लागते.

जामखेडला 2016 मध्ये नगरपालिकेची निर्मिती झाली.त्यामुळे हा भाग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातून वगळून नगरपालिकेला जोडला. त्यामुळे जिल्हा परिषदेचा जामखेड गट व गण संपुष्टात आला. साकत गणाचे विभाजन होऊन काही भाग खर्डा गटाला व काही भाग जवळा गटाला जोडला. या दोन्ही गटात खर्डा, साकत, नान्नज, हळगाव अशा गणांची निर्मिती झाली. आगामी निवडणुकांसाठी गट व गणाच्या फेररचनेसंदर्भात निवडणूक आयोगाकडून नगर जिल्हा परिषदेला पत्र प्राप्त झाले.

"सन २०१७ मध्ये जामखेड तालुक्यातील तीन गट व सहा गणांपैकी एक गट आणि दोन गण कमी झाले. त्यासाठी जामखेड नगरपालिकेची निर्मिती कारणीभूत ठरली. आता मतदार वाढले आहेत. त्यामुळे गट आणि गण वाढायला हवेत."

- दत्तात्रेय वारे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

"जामखेड तालुक्यात दोन गट व चार गण आहेत. याबाबत अद्यापि वरिष्ठ कार्यालयाकडून कोणत्याही सूचना वा निर्देश आलेले नाहीत. लोकसंख्येच्या निकषानुसार फेररचना होऊन त्यात वाढ होऊ शकते."

- योगेश चंद्रे, तहसीलदार, जामखेड

loading image
go to top