करवीर तहसीलदारांचा पासवर्ड कार्यालयाबाहेरील लोकांकडे | Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर : करवीर तहसीलदारांचा पार्सवर्ड कार्यालयाबाहेरील लोकांकडे

कोल्हापूर : करवीर तहसीलदारांचा पासवर्ड कार्यालयाबाहेरील लोकांकडे

कोल्हापूर : अशासकीय आणि कार्यालयाबाहेरील लोकांकडून तहसीलदारांच्या डेस्कवरील पासवर्ड वापरून डोमेसाईल प्रमाणापत्र, उत्पन्नाचे दाखले मंजूर केले जात आहे. त्यामुळे शासकीय नियमानुसार पंधरा दिवसात जे डोमेसाईल प्रमाणापत्र, उत्पनाचे दाखले किंवा इतर दाखले दिले जातात. तेच दाखले ठराविक महा ईसेवा केंद्र चालकांना त्याच दिवशी कसे मिळतात? त्यासाठी हे महा ई सेवा केंद्र चालक ठरलेल्या रक्कमेपेक्षा जादा दर आकारत असल्याच्या तक्रारी आहेत. पासवर्ड सरकारी अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कार्यालयाबाहेरील अशासकीय लोकांकडेही गेला आहे, यामध्ये सर्वात "विशाल' आणि "उत्तम' कामगिरी करणारे दोघेजण आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

करवीर तहसील कार्यालयांतर्गत 129 गावे व शहर येते. येथील सर्व विद्यार्थांसह इतरांना दाखले दिले जातात. याच कार्यालयांतर्गत 150 हून अधिक व्हीएलई (महा ईसेवा केंद्र चालक) काम करतात. या सर्वांकडून विविध प्रकारचे दाखले सोडले जातात. तहसीलदार कार्यालयाकडून मंजूर केले जातात. यासाठी ठराविक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे हा पासवर्ड आहे. पण शासकीय गोपनिय पासवर्ड अशासकीय महा ई सेवा केंद्र चालकांकडेही दिला आहे. तहसीलदारांच्या अपरोक्ष ज्या कर्मचाऱ्याला हा पासवर्ड माहिती आहे त्याच्याकडून इतर लोकांनाही दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात येत आहे.

हेही वाचा: नाशिक : मनमाड रेल्वे स्थानकातून धावू लागली पॅसेंजर

ज्या महा ई सेवा केंद्र चालकांकडे हा पासवर्ड आहे त्याने आपल्या केंद्रावरून सोडलेले दाखले त्याच दिवशी मंजूर झाल्याचे चित्र आहे. तर इतर महा ई सेवा केंद्र चालकांना दाखला देण्याचे नियम सांगितले जात आहेत. यामुळे पासवर्डचा गैरवापर होत असल्याचे चित्र आहे. याला आळा घालण्यासाठी आता खुद्द तहसीलदारांनाच लक्ष घालावे लागणार आहे. ज्यांकडून हा पासवर्ड तहसीलदार कार्यालयाबाहेर जातो, त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी तहसीलदारांची आहे. तहसीलदार कार्यालयांतर्गत येणाऱ्या महा ई सेवा केंद्र चालकांच्या मदतीने दिवाळीची सुट्टी असतानाही 5 हजार 800 हून अधिक विविध दाखले दिले आहेत. पण, ठराविक महा ई सेवा केंद्र चालकांचे लाड करणाऱ्यांच्या कारभारला चाप बसलाच पाहिजे, अशीही मागणी होत आहे. विद्यार्थांना आवश्‍यक सर्व दाखले तात्काळ मिळाले पाहिजेत, पण ते ठराविक लोकांनाकडून गेल्यानंतरच मिळतात, हे चित्र आता बदलण्‍याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

तातडीच्या कामासाठी ठराविक अधिकाऱ्यांना हा पासवर्ड दिला जातो. तसेच वारंवार तो पासवर्ड बदललाही जातो. ज्यांच्याकडे पासवर्ड दिला जातो. त्यांना त्याचा गैरवापर होवू नये, अशा सूचना दिल्या जातात. कोण त्याचा चुकीचा वापर करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

- शीतल मुळ्ये-भामरे, तहसीलदार, करवीर.

loading image
go to top