Success Story ः डाळिंबापेक्षाही बांबूची शेती आहे फायद्याची, सेवानिवृत्त मास्तरांनी कसं जमवलंय आर्थिक गणित पहा

Retired masters improve agricultural economics!
Retired masters improve agricultural economics!

संगमनेर ः पारंपरिक शेतीला आता आधुनिकतेची जोड दिली जात आहे. उच्चशिक्षित तरूणही शेतीकडे वळले आहेत. काहीजणांची अनुभवाअभावी होरपळ होते. मात्र, काहीजण अपयशावर मात करीत नवनवीन प्रयोग करीत आहेत. त्यातून त्यांना लाखोंचे उत्पन्नही मिळत आहे. एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकानेही आपल्या शेतात अनोखा प्रयोग केला आहे. बांबूमुळे केवळ घरगुती वस्तूच नव्हे तर तो बिल्डिंगमध्ये वारण्यात येणाऱ्या स्टीललाही पर्याय ठरत आहे.

केंद्र सरकारने बांबूच्या शेतीचा पर्याय सूचवला आहे. सीएनजी गॅसमध्येही त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. प्लॅस्टिकलाही तो पर्याय ठरत आहे. प्लायवूड, टाईल्स, तसेच ज्वेलरीही बांबूपासून बनविता येतात. त्यामुळे बांबू शेती फायद्याची ठरणार आहे. मात्र, पारंपरिक बांबूऐवजी नव्या जातींची लागवड करणे गरजेचे आहे. संगमनेर तालुक्यातील शेतकरी सजग झाले आहेत. त्यांनी बांबूच्या बागा फुलवल्या आहेत.

संगमनेर तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील जवळे कडलग येथे बांबूसह बटाटे व त्यात शाश्वत उत्पन्न देणाऱ्या आले या मसाल्याच्या पदार्थाचे यशस्वी मिश्रपीक घेण्यात सेवानिवृत्त मुख्याध्यापक सोपान जयराम सुर्वे (75 ) यांना यश आले आहे. उच्चशिक्षित व तंत्रज्ञानाची कास धरणाऱ्या मुलांच्या मदतीने त्यांनी डाळिंब व उसाचे आगार असलेल्या क्षेत्रात वेगळा प्रयोग केला आहे. 

सह्याद्री शिक्षण संस्थेत सुमारे 36 वर्षे शिक्षकाची नोकरी करून सेवानिवृत्त झालेल्या सुर्वे यांनी शेतात विविध प्रयोग करण्यास सुरवात केली. आतबट्ट्याचा व्यवसाय समजल्या जाणाऱ्या शेतीत, शाश्वत उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने मुलगा संतोष याने अॅड. श्रीराम गणपुले यांच्यासमवेत कोकण व आसाममधील बांबू प्लॉटला भेटी देत शास्त्रीय दृष्टिकोनातून माहिती घेतली.

सुर्वे यांनी 6 एकर क्षेत्रात नर्सरीत बांबूची रोपे तयार करण्यासाठी जुलै 2019 मध्ये साडेसात बाय साडेसात फूट मापात लागवड केली. यासाठी बांबूच्या जातीप्रमाणे एकरी 22 ते 40 हजार रुपयांपर्यंत खर्च आला. अवघ्या 14 महिन्यांत त्यांची वाढ 25 फूट झाली. दोन वर्षांनंतर कोंबापासून नर्सरीत रोपे तयार करण्यात येणार आहेत. 

बांबूच्या या आहेत जाती

कोणत्याही हवामानात वाढणाऱ्या या पिकाला कीड पडत नसल्याने इतर खर्च वाचतो. सुर्वे यांच्या नर्सरित 70 ते 100 फूट वाढणारी बांबूसा बल्कोवा, ग्रीन व्हीलगॅरीस, टुल्डा, ब्रॅंडिसा, जिग्नॅशियम, ऑलिव्हेरी, लॉजीस पॅथरा या जातीची रोपे लावली आहेत. 

बांबूच्या बागेत आले आणि बटाटा

उर्वरित क्षेत्रात पाण्याचा निचरा होणाऱ्या हलक्‍या प्रतिच्या जमिनीत त्यांनी स्वतंत्रपणे पाऊण एकरात बटाटा व एक एकरात बटाट्यामध्ये आल्याचे आंतरपीक घेतले आहे. त्यासाठी कोंबडखत, रासायनिक खत व लिंबोळी खताची योग्य मात्रा दिली आहे. गरजेनुसार तणनाशकाचा वापर केला. आले हे बाजारभाव नसल्यास वर्षभर टिकवून ठेवणारे शाश्वत पीक आहे. यासाठी त्यांना बापूसाहेब कडलग, नितीन सुर्वे, अमित हासे, हिरालाल सुर्वे, ऍड. श्रीराम गणपुले, संतोष तक्‍ते यांचे सहकार्य लाभले. 

शेतीत पारंपरिक पीक घेण्याऐवजी नवीन काही तरी प्रयोग केला आहे. शेती करताना सरकारी धोरणही लक्षात घेणे गरजेचे आहे. आगामी काळात बांबू शेतीला सोन्याचे दिवस येणार आहेत. कारण बांधकाम साहित्य म्हणून बांबूचा उपयोग केला जातो. स्टील इतकीच मजबूत बांबू वापरलेली बिल्डिंग असते. नाशिकमध्ये अशा काही बिल्डिंग आहेत. तब्बल ७० टक्क्यांपर्यंत खर्चात बचत होते. बांबूपासून शेतकऱ्यांनी बायप्रॉडक्ट निर्माण केल्यास दरवर्षी लाखोंचा फायदा होईल. साधारण एकरी ३५ ते ४० हजारांचा खर्च येतो. चार वर्षानंतर बांबू उत्पादन मिळते. तोपर्यंत तुम्ही मसाल्याची आंतरपीके घेऊ शकता. एकदा लागवड केल्यानंतर दरवर्षी फार खर्च नसतो. मार्केटचा अंदाज घेऊन शेती केल्यास नक्कीच ती फायद्याची ठरते, हा माझा अनुभव आहे. बांबू शेतीचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे.

- संतोष सोपान सुर्वे, शेतकरी, जवळे कडलग, संगमनेर.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com