esakal | केंद्रामुळेच बाजार समित्या संकटात: महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
sakal

बोलून बातमी शोधा

Revenue Minister Balasaheb Thorat

या नव्या कायद्यांमुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या शेतीमाल खरेदीवर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. हे जुलमी कायदे रद्द करण्यासाठी काँग्रेसने सातत्याने आवाज उठवला आहे.

केंद्रामुळेच बाजार समित्या संकटात: महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

संगमनेर (अहमदनगर) : दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या संपूर्ण देशासाठी मॉडेल ठरल्या. मात्र, सध्याच्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे त्या मोठ्या संकटात आल्या आहेत.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या अद्ययावत व चांगल्या सुविधांसह त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी काम केले असून, वडगाव पान येथील उपबाजार समितीमुळे चांगली सुविधा निर्माण झाल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. वडगाव पान येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारातील फ्लॉवर मार्केट व अंतर्गत रस्ते कामाच्या प्रारंभाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते.

हेही वाचा: संगमनेर शहरात होणार ज्येष्ठ नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण

ते म्हणाले की, शेतीमालाला योग्य हमीभाव व चांगली सुविधा मिळावी यासाठी कृषी बाजार समित्या निर्माण झाल्या आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या समित्यांसह शेतकरी अडचणीत आले आहेत. या काळ्या कायद्यांविरोधात मागील सहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार त्याला दाद देत नाही.

हेही वाचा: संगमनेर तालुक्यातील ६९ गावे कोरोनामुक्त

या नव्या कायद्यांमुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या शेतीमाल खरेदीवर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. हे जुलमी कायदे रद्द करण्यासाठी काँग्रेसने सातत्याने आवाज उठवला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारने या कायद्यांमध्ये अमुलाग्र दुरुस्तीसाठी विधानसभेत विधेयक मांडले.

शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्यांच्या सूचना विचारात घेऊन नवा कायदा तयार होणार आहे. बाजार समितीने संगणकीकरणासह शेतकऱ्यांना अत्यंत चांगल्या सुविधा दिल्या आहेत. वडगाव पान येथील उपबाजार समितीमुळे भाजीपाला मार्केटसाठी स्वतंत्र विभाग तयार होऊन शेतकऱ्यांना चांगली सुविधा मिळेल. हे ठिकाण मध्यवर्ती असल्याने आगामी काळात रस्ते चौपदरीकरण, रेल्वे वाहतूक या सर्व सुविधांमुळे या बाजार समितीचे महत्त्व वाढणार आहे.

हेही वाचा: संगमनेर पुन्हा कोरोनाच्या रडावर, साडेसातशे रूग्ण

प्रास्ताविक सभापती शंकर खेमनर यांनी केले. बाजीराव खेमनर, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, रणजितसिंह देशमुख, अॅड. माधव कानवडे, सुनंदा जोर्वेकर, रामहरी कातोरे, डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, बांधकाम विभागाचे आर. आर. पाटील, सरपंच श्रीनाथ थोरात, सचिव सतीश गुंजाळ उपस्थित होते.

loading image