ब्रेकिंग ः लॉकडाउनबाबत महसूल मंत्री थोरात यांचे मोठे वक्तव्य

Revenue Minister Thorat's big statement about lockdown
Revenue Minister Thorat's big statement about lockdown

संगमनेर ः संगमनेर तालुक्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय आहे. यासाठी प्रशासनाच्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य व महसूलसह सर्वपक्षीय कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्था ही साखळी तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, यात नागरिकांची भूमिका अत्यंत महत्वाची अाहे. त्यांनी याबाबतीत स्वयंशिस्त व शासकीय नियमांचे पालन न केल्यास, संगमनेर तालुक्यात कठोर लॉकडाऊनच्या दिशेने पावले उचलावी लागतील, असे संकेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

आज दुपारी संगमनेर येथील शॅम्प्रो संस्थेच्या प्रांगणात निवडणूकीनंतर मंत्रिपद, सरकार स्थापना व कोरोनाचे राज्यावर आलेले संकट या बाबत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मंत्रिपदाच्या एक वर्षाच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला.

या कारणांमुळे झाली वाढ

थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. गेल्या चार महिन्याच्या कोरोना संकटात प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते व संघटनांनी कौतुकास्पद काम केले आहे. मात्र, लॉकडाऊननंतर मिळालेल्या शिथिलतेचा गैरफायदा घेतल्याने लग्न, वाढदिवस, जेवणावळी आणि बाहेरच्या शहरातून आलेले पाहुणे किंवा केलेल्या निष्काळजी प्रवासामुळे संसर्गात वाढ झाली आहे.

आगामी काळात भाजीपाला बाजार, पेठेतील दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी ठिकाणच्या गर्दीला शिस्त लावण्यासाठी स्वयंसेवी संस्था, होमगार्ड, एनसीसी, एनएसएस यांची मदत घ्यावी लागेल. दुकानदार व नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन न केल्यास, लॉकडाऊन न करताही कोरोनाची साखळी तोडणे शक्य आहे. त्यासाठी  नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.

याच गर्दीतून आपल्याबरोबर कुटूंबात कोरोना येतो याची जाणीव ठेवून, स्वतःबरोबर कुटूंबासाठी तरी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच या प्रक्रियेत अमृत उद्योग समूह व डॉ. हर्षल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएमबीटी पूर्ण क्षमतेने काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

राज्याच्या तुलनेत संगमनेरातील रुग्णांचा रिकव्हरी रेट अधिक म्हणजे 62 टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या संगमनेर मध्ये 115 अँक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील 113 रुग्णांना कोणत्याही प्रकारचे लक्षणे नाहीत, तर दोन रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत संगमनेर मधून 2 हजार 440 लोकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.

गेले चार महिने प्रशासन अत्यंत जबाबदारीने ही लढाई लढत आहे. त्यांच्या जोडीने वैद्यकीय अधिकारी, कार्मचारी, खासगी डॉक्टर, पोलिस, महसूल अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचे मोठे योगदान मोठे आहे.

ही लढाई सामाजिक जागृती करुन आणि समाजाला सोबत घेऊन लढावी लागणार आहे. घुलेवाडीच्या कोविड रुग्णालयाची क्षमता वाढवून 90 बेडची केली असून, शहरातील मौलाना आझाद मंगल कार्यालय आणि नगरपालिकेचे कॉटेज हॉस्पिटल येथे कोविड सेंटर सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

कुरण येथे तातडीने कोविड सेंटर सुरु केले आहे. तालुक्यातील सर्व कोविड सेंटरची क्षमता 500 बेडची आहे. सरकारी आणि खासगी कोविड तपासणी करणारा संगमनेर हा जिल्ह्यातील पहिला तालुका आहे. तसेच मोठ्या प्रमाणात रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

वैयक्तिक पातळीवर मीच माझा आणि माझ्या कुटुंबाचा रक्षक या सूत्राने आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, डॉ. हर्षल तांबे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com