esakal | ऑक्सिजनच्या नावाखाली विनाकारण रुग्णांची लुट करु नका
sakal

बोलून बातमी शोधा

Review meeting of corona infected patients in Sangamner taluka

कोरोनाबाधित रुग्णावर योग्य उपचार होणे आवश्यक आहे. गरज असल्यास रुग्णाला ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा द्यावी, मात्र ऑक्सिजनच्या नावाखाली खासगी रुग्णालयांनी विनाकारण रुग्णांची लुट करु नये, असा इशारा शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिला.

ऑक्सिजनच्या नावाखाली विनाकारण रुग्णांची लुट करु नका

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : कोरोनाबाधित रुग्णावर योग्य उपचार होणे आवश्यक आहे. गरज असल्यास रुग्णाला ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा द्यावी, मात्र ऑक्सिजनच्या नावाखाली खासगी रुग्णालयांनी विनाकारण रुग्णांची लुट करु नये, असा इशारा शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिला. 

संगमनेरातील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील प्रांताधिकारी कार्यालयात संगमनेर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या भीतीचा फायदा घेत, सध्या किरकोळ लक्षणे असली तरी ऑक्सिजन लावण्याच्या नावाखाली रुग्णाची लूट केली जात असल्याची तक्रार, पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते अशोक सातपुते आणि शिसेनेचे उपशहर प्रमुख रवी कानडे यांनी केली. यावर भाष्य करताना लोखंडे यांनी डॉक्टरांनी माणूसकी धर्माचे पालन करीत, रुग्णांना विनाकारण आर्थिक त्रास न देण्याची सूचना केली. तसेच असा प्रकार आढळल्यास सक्त कारवाई करण्याच्या सूचना केल्या. खासगी प्रयोगशाळेत सर्दी, खोकला अशी किरकोळ लक्षणे असली तरी, जादा दराने तपासणीचे पैसे आकारले जातात. अशा तपासण्या खासगी ऐवजी ग्रामीण रुग्णालय स्तरावर करण्याची सूचनाही त्यांनी केली.

रुग्णालयाचे बील शासकिय दराने घेतले जात असले, तरी मेडिकलची बीले मात्र जास्त येत असल्याकडे त्यांचे लक्ष्य वेधण्यात आले. कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या वेळी वापरण्यात येणारे पीपीई कीट, रॅपिड अँटीजेन चाचण्या करणाऱ्या कंत्राटी अधिकाऱ्यांची अरेरावी, ट्रॉमा केअर सेंटर आदी बाबतीत तक्रारी करण्यात आल्या.

या वेळी गुलाब भोसले, बाळासाहेब घोडके, जनार्दन आहेर, ज्ञानेश्वर कांदळकर, रविंद्र गिरी, दीपक साळुंके, शरद थोरात आदींनी सहभाग घेतला. यावेळी कोरोना संकटाच्या काळात केलेल्या रुग्ण सेवेबद्दल डॉ. अमोल कर्पे यांचा खासदार लोखंडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image