शेतकऱ्यांच्या खात्यात 52 कोटी; पीकविमा, अतिवृष्टीपोटी भरपाई जमा

मनोज जोशी
Tuesday, 27 October 2020

पीकविमा भरपाई व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळून कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर 52 कोटी रुपये जमा झाले. आता हमी भावानुसार शेतमाल खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे.

कोपरगाव (अहमदनगर) : मागील वर्षीचा पीकविमा भरपाई व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळून कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर 52 कोटी रुपये जमा झाले. आता हमी भावानुसार शेतमाल खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. त्यासाठी बाजार समितीने पुढाकार घ्यावा. आपण आवश्‍यक ती मदत करू, अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली. 

सरकारी अधिकारी व शेतकऱ्यांच्या आढावा बैठकीत काळे बोलत होते. पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, उपसभापती अर्जुन काळे, कारभारी आगवन, पद्मकांत कुदळे, मंगेश पाटील, काकासाहेब जावळे, गोरक्षनाथ जमादार आदी उपस्थित होते. 

काळे म्हणाले, ""मागील वर्षी कांदाचाळ, शेततळी, कृषी सिंचन योजनांचे अनुदान, तसेच खरीप व फळबाग विम्यापोटी 22 कोटी व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी 30 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा झाले आहेत. केंद्र सरकारने केवळ महाराष्ट्रात कांदाउत्पादक व व्यापाऱ्यांवर निर्बंध आणले. खरे तर कांद्याला चांगला भाव मिळणे गरजेचे आहे.'' 

कृषी अधिकारी अशोक आढाव म्हणाले, ""आमदार काळे यांच्या पाठपुराव्यामुळे मागील वर्षीचे कृषी अनुदान व पीकविमा भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देणे सोपे झाले. वरिष्ठ पातळीवर ते प्रयत्न करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो.'' 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Review meeting of MLA Ashutosh Kale in Kopargaon taluka