esakal | विखे पाटलांच्या हाती जामखेडचा युवा चेहरा, सोलेपाटील पिता-पुत्रांची यापूर्वी होती चलती
sakal

बोलून बातमी शोधा

The rise of Ralebhat in the politics of Jamkhed taluka

या निमित्ताने राळेभात कुटुंबातील दुसऱ्या पिढीचा सहकारी बँकेच्या राजकारणात प्रवेश झाला आहे.

विखे पाटलांच्या हाती जामखेडचा युवा चेहरा, सोलेपाटील पिता-पुत्रांची यापूर्वी होती चलती

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी जामखेड तालुका सोसायटी मतदारसंघातून अमोल जगन्नाथ राळेभात यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीने राळेभात कुटुंबातील दुसऱ्या पिढीचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात प्रवेश झाला.

तालुक्यातील सर्वात कमी वयाचे संचालक होण्याचा 'मान' अमोल यांना मिळाला. विशेष म्हणजे अमोल यांचे वडील जगन्नाथ तात्या राळेभात यांची  सहकारी बँकेच्या राजकारणात पहिल्यांदा 'बिनविरोध' संचालक होऊनच सुरुवात झाली होती. तोच कित्ता अमोल  यांनी गिरवला.

या पूर्वी सहकार महर्षी स्वर्गीय गोपाळराव सोले पाटील व त्यांचे पुत्र पांडुरंग पाटील सोले हे दोघे पिता-पूत्र जामखेड तालुक्यातून सहकारी बँकेवर 'संचालक' झाले होते. सोले पाटील यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची धुराही सांभाळली.

दरम्यान साहेबराव आबा पाटील हे देखील बँकेवर संचालक व अध्यक्ष राहिले. या दोघांनंतर जगन्नाथ तात्या राळेभात हे विखे समर्थक म्हणून प्रदीर्घ काळ बँकेवर संचालक राहिले. मात्र सत्तेच्या सारीपाटात त्यांच्या काळात बँकेच्या सत्तेची सूत्रे थोरात गटाकडे अधिक राहिल्याने पदाधिकारी होण्याची संधी तात्यांना मिळाली नाही. मात्र, बँकेच्या संचालक मंडळात त्यांचा दबदबा कायम राहिला.

पिता-पूत्र संचालक होण्याचा मान सोले पाटील कुटुंबीयानंतर यावेळी राळेभात कुटुंबाला मिळाला. या राजकीय नोंदीची बरोबरी ही अमोल यांच्या निवडीने साधली गेली.

कशी मिळाली बिनविरोधची संधी

जामखेड तालुका सोसायटी मतदारसंघातून तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी आमदार रोहित पवारांच्या सांगण्यावरुन तीन दिवसांपूर्वी आपला उमेदवारी अर्ज काढून घेतल्यानंतर ज्येष्ठ संचालक जगन्नाथ तात्या राळेभात व त्यांचे चिरंजीव अमोल या दोघांचेच अर्ज राहिले होते. काल ते जगन्नाथ तात्या यांनी आपला उमेदवारी अर्ज माघे घेतल्याने अमोल यांची  बिनविरोध निवड झाली.

अमोल हे अभ्यासू आणि स्पष्टवक्ते

या निमित्ताने राळेभात कुटुंबातील दुसऱ्या पिढीचा सहकारी बँकेच्या राजकारणात प्रवेश झाला आहे. अमोल हे खासदार डॉ. सुजय विखे यांचे खंद्दे समर्थक म्हणून ओळखले जातात. तसेच जामखेड तालुका खरेदी विक्री संघाचे विद्यमान अध्यक्ष म्हणून ते काम करीत आहेत. त्यांचे वडील जगन्नाथ तात्या राळेभात यांच्या राजकीय प्रवासात ते सावलीसारखे त्यांच्या सोबत राहिलेले आहेत. त्यामुळे पहिल्यांदा त्यांना संधी मिळालेली असली तरी बँकेच्या कामकाजाची त्यांना चांगली माहिती आहे. अभ्यासू आणि स्पष्टक्तेपणा ही त्यांची खासियत आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

loading image