भातुकलीच्या खेळातूनच चिमुकल्यांवर होतात संस्कार

दत्ता इंगळे
Monday, 16 November 2020

"भातुकली' या शब्दात अख्खे बालपण सामावले आहे. लहानपणी प्रत्येकानेच घराच्या अंगणात एकदा तरी भातुकलीचा खेळ मांडला असेलच. भातुकलीच्या खेळातूनच चिमुकल्यांवर संस्कार होतात.

अहमदनगर : "भातुकली' या शब्दात अख्खे बालपण सामावले आहे. लहानपणी प्रत्येकानेच घराच्या अंगणात एकदा तरी भातुकलीचा खेळ मांडला असेलच. भातुकलीच्या खेळातूनच चिमुकल्यांवर संस्कार होतात. काळाच्या ओघात हा ठेवा मागे पडला. मुले आता मोबाईलफॅन झाले. कोरोनामुळे ऑनलाइन अभ्यास सुरू झाला. जोडीला व्हिडीओ गेम, कार्टुन फिल्मस्‌, मोबाईल गेम आले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
घराबाहेर एखाद्या कोपऱ्यात एका रांगेत मांडलेला भातुकलीचा खेळ. चिनी माती किंवा प्लॅस्टिक कपबशीचा सेट, छोटे कुकर, इवलेसे चमचे, झारे, छोटाशी चूल, शेगडी, छोटी पातेली, जातं, रंगबेरंगी लाकडी भांडी, कपाट, झाडू, कोणाकडे बादली, पाणी तापवण्याचा बंब. भातुकली म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर हेच चित्रं उभं राहतं. सुटीच्या दिवशी भातुकलीचा खेळ दिवसभर रंगायचा. 

खोट्या खोट्या स्वयंपाकासाठी घरात आईला किंवा आजीला लाडी-गोडी लावून कधी चुरमुरे, तर कधी दाणे, कधी चिवडा, तर कधी बिस्किट, असा काही ना काही खाऊ जमा केला जायचा. त्यात कोणी आई व्हायचं, तर कोणी बाबा. कोणी लहान मुलं, तर कोणी शाळेतली शिक्षिका. त्यांचा लुटुपुटुचा संसार रंगायचा.

भातुकली खेळणाऱ्या मुलींकडे कौतुकाने पाहिलं जायचं. भावी आयुष्यात केल्या जाणाऱ्या संसाराचं बीज मुलींच्या मनात रुजवलं जायचं. असा हा भातुकलीचा खेळ रंगायचा आणि नंतर मोडायचाही. भातुकली म्हटली, की अनेकांच्या बालपणीच्या आठवणी ताज्या होतात. हल्ली भातुकली काहीशी विस्मृतीत गेल्याचे दिसते. फ्लॅट सिस्टीम आली आणि आईचं पत्र हरवलं, या खेळातील पत्राप्रमाणे घराचे अंगणही हरवलं. पाळणाघराची संस्कृती रूजली.  

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rites are performed on Chimukalya through the game of Bhatukali