esakal | अटक केल्यास आंदोलन तिव्र केले जाईल; स्वाभीमानीचे कार्यकर्ते व पोलिस यांच्या शाब्दिक चकमक
sakal

बोलून बातमी शोधा

Road blockade on onion export ban on Rahuri Nagar Manmad Highway

राहुरी येथे नगर- मनमाड महामार्गावर कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रस्ता रोको व केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन प्रसंगी पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख व 'स्वाभिमानी'चे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यात भर रस्त्यावर शाब्दिक चकमक उडाली.

अटक केल्यास आंदोलन तिव्र केले जाईल; स्वाभीमानीचे कार्यकर्ते व पोलिस यांच्या शाब्दिक चकमक

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : राहुरी येथे नगर- मनमाड महामार्गावर कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रस्ता रोको व केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन प्रसंगी पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख व 'स्वाभिमानी'चे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यात भर रस्त्यावर शाब्दिक चकमक उडाली. अटक केल्यास, आंदोलन तीव्र केले जाईल. असा मोरे यांनी इशारा दिल्यावर पोलिसांनी सौम्य भूमिका घेतली.

राहुरी येथे शनिवारी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर- मनमाड रस्त्यावर 'स्वाभिमानी'चे उत्तर जिल्हाध्यक्ष मोरे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष दिनेश वराळे, सतीश पवार, आनंद वने, सचीन पवळे, प्रमोद पवार, निलेश लांबे, प्रवीण पवार, किशोर वराळे, विजय तोडमल, सचीन म्हसे, सचीन गडगुळे, अतुल तनपुरे व इतरांनी आंदोलन छेडले. कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून, भर रस्त्यावर केंद्रीय कृषिमंत्री यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख व सहाय्यक निरीक्षक सचीन बागुल यांनी मोरे यांना पकडून अटक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला. भर रस्त्यात मोरे यांनी पोलिस निरीक्षक देशमुख यांना खडेबोल सुनावले. पोलिसांच्या दडपशाहीमुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.

मोरे म्हणाले, पंधरा दिवसांपासून कांद्याला भाववाढ मिळाली. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. परंतु,  केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हेच कांदा निर्यात बंदीच्या निर्णयास कारणीभूत आहेत. केंद्रातील भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याचे सिद्ध झाले. कोरोनाच्या लॉकडाउन मध्ये भाजीपाला, फळे, दूध व इतर शेतमाल कवडीमोल भावात विकला. शेतकरी आर्थिक संकटात सापडला. या काळात देशभरात बारा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु, शासनाने चित्रपट अभिनेता सुशांतसिंग रजपूत याच्या आत्महत्येला जास्त महत्त्व दिले. 

राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कांद्याचे बियाणे महागले. परंतु, निर्यातबंदीमुळे दर कोसळत आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची जगणे कठीण केले आहे. कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला नाही. तर, तीव्र आंदोलने छेडली जातील." असा इशारा मोरे यांनी दिला. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image