पाथर्डीत रस्ता लुटीचा नवाच फंडा

सतीश वैजापूरकर
Saturday, 12 September 2020

ते शुद्धीवर आले तेव्हा खरवंडी आरोग्य केंद्रात दाखल होते. त्यांना दवाखान्यात कोणी नेले, कोणत्या वाहनातून नेले याबाबतही थोरात यांना काहीच सांगता येत नाही.

पाथर्डी ः रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला अडवायचे, त्याच्या चेहऱ्यावर गुंगीचे औषध फवारून त्याच्याकडील ऐवज लुटून त्याच्याच मोटारसायकलने फरार व्हायचे, असा नवा फंडा आता लुटारूंनी अवलंबिला आहे. या टोळक्‍यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. 

येथील तहसील कार्यालयातील संगणकीय कामे पाहणारे विष्णू थोरात (भवरवाडी) गेल्या गुरुवारी (ता. 10) रात्री नऊला पाथर्डीहून भवरवाडीकडे जात होते. राष्ट्रीय महामार्गावर फुंदेटाकळी शिवारात रस्त्याच्या कडेला ते मोटारसायकलवरून बेशुद्ध होऊन पडले. त्यांच्यासोबत नेमका काय प्रकार घडला, हेच त्यांना सांगता येत नाही. त्यांच्या मोटारसायकलसह लॅपटॉप, थंब मशिन, मोबाईल असा 40 हजारांचा ऐवज लुटारूंनी लांबविला.

हेही वाचा - पारनेरमधील ८८ ग्रामपंचायती गेल्या प्रशासकांच्या ताब्यात

ते शुद्धीवर आले तेव्हा खरवंडी आरोग्य केंद्रात दाखल होते. त्यांना दवाखान्यात कोणी नेले, कोणत्या वाहनातून नेले याबाबतही थोरात यांना काहीच सांगता येत नाही. पोलिसांनी विष्णू थोरात यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. आठ दिवसांपूर्वीही एका शिक्षकाला अशाच पद्धतीने गुंगीचे औषध देऊन किंवा फवारून लुटल्याची घटना येळी शिवारात घडली होती.

चोरट्यांनी लुटीसाठी नवा फंडा अवलंबिल्याने आपली लूट झाली कशी हेच कोणाला सांगता येत नसल्याने पोलिसही तपासात हतबल ठरत आहेत. रस्ता लुटीच्या पंधरा दिवसांत सात घटना घडल्या. विशेष म्हणजे मोटारसायकलस्वारांनाच चोरट्यांनी लक्ष केले असून, रात्रीच्या वेळी जाणाऱ्या मोटारसायकलस्वारांनी सावधानता बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road robbery incident in Pathardi