रोहोकलेप्रणीत गुरूमाऊली मंडळाचे घंटानाद आंदोलन

दौलत झावरे
Tuesday, 22 December 2020

या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी प्रसंगी न्यायालयात जाऊ, असा इशारा रावसाहेब रोहोकले प्रणित गुरूमाऊली मंडळाचे अध्यक्ष विकास डावखरे यांनी दिला आहे. 

नगर ः जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेतील घड्याळ खरेदीत गैरव्यवहार झाला असून, त्याची कागदपत्रे देण्याच्या मागणीसाठी रावसाहेब रोहोकले प्रणित गुरूमाऊली मंडळाने आज जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. 

शिक्षक बॅंकेच्या सत्ताधाऱ्यांनी सभासदांना शताब्दी महोत्सवानिमित्त दिलेल्या घड्याळ खरेदीत अपहार केला आहे. याबाबतची कागदपत्रे बॅंकेकडे मागूनही दिली जात नाही.

या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी प्रसंगी न्यायालयात जाऊ, असा इशारा रावसाहेब रोहोकले प्रणित गुरूमाऊली मंडळाचे अध्यक्ष विकास डावखरे यांनी दिला आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की जिल्हा उपनिबंधकांनी बॅंक प्रशासनास दोन वेळा स्पष्ट लेखी आदेश देऊनही बॅंक प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी खोटी कारणे देत माहिती देण्यास टाळाटाळ केली.

हेही वाचा - भाजपला जबर हादरा, दोन मातब्बर नेते गेले काँग्रेसमध्ये

वर्षभरापासून अर्ज, विनंत्या करूनही घड्याळ खरेदीबाबतची कागदपत्रे दिली जात नाहीत. या संबंधातील सर्व पुरावे आमच्याकडे असून, आम्ही सनदशीर मार्गाने जिल्हा उपनिबंधकांनी नियुक्त केलेल्या चौकशी अधिकाऱ्यांकडे सहा जानेवारीला जाणार आहोत. 

गुरूमाऊली मंडळाचे विकास डावखरे, संजय शेळके, प्रवीण ठुबे, आर. पी. रहाणे, राजेंद्र थोरात, संजय शिंदे, राजेंद्र मुंगसे, मंजूषा नरवडे आदी आंदोलनात सहभागी झाले होते. 

"सीईओं'च्या कार्यालयास टाळे ठोकू 
घड्याळासंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासन म्हणून बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आहे. घड्याळासंदर्भातची कागदपत्रे येत्या 15 दिवसांत न दिल्यास, बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी दिला आहे. 

"घंटानाद'चे नाटक ः फुंदे 
नगर ः प्राथमिक शिक्षक विकास मंडळात केलेल्या गौडबंगालातून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी विरोधक घंटानाद आंदोलनाचे नाटक करीत आहेत. शिक्षक बॅंकेतील घड्याळ खरेदीचा व्यवहार अत्यंत पारदर्शी आहे. ऑनलाइन किमती उपलब्ध आहेत.

कंपनीचा करार उपलब्ध आहे. 90 टक्के सभासदांनी घड्याळे नेली आहेत. त्याबद्दल सर्वांच्या चांगल्या प्रतिक्रिया आहेत. सासवड अधिवेशनाचा हिशेब देण्याऐवजी संघटना बदलणाऱ्यांनी असली नाटके, आंदोलने करू नयेत, अशी टीका गुरूमाऊली मंडळाचे सरचिटणीस विठ्ठल फुंदे यांनी केली. 

विकास मंडळाचा कारभार पारदर्शक आहे. जिल्हा उपनिबंधकांनी ठेवी विकास मंडळाकडे वर्ग करण्याबाबतचा आदेश देऊनही सत्ताधाऱ्यांनी त्या वर्ग केल्या नाहीत. त्यामुळे काम बंद असल्याचे विकास मंडळाचे माजी अध्यक्ष संजय शिंदे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohkale's Gurumauli Mandal agitation