सकारात्मक.. यात्रा-सप्ताहातील खर्च टाळून ग्रामविकासावर भर 

Rural development by avoiding Yatra festival expenses
Rural development by avoiding Yatra festival expenses

राहुरी : शेरी-चिखलठाण येथे काल (बुधवारी) आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर लोकसहभागातून वृक्षारोपण मोहिमेस सुरवात झाली. वन खात्याच्या जमिनीवर दरवर्षी पाच हेक्‍टरवर पाच हजार वृक्षारोपण करायचे. लागवड केलेल्या वृक्षांचे चार वर्षे संगोपन करायचे, असा ग्रामस्थांचा संकल्प आहे.

ज्ञानोबा, माऊली, तुकाराम... पंढरिनाथ महाराज की जय.. अशा जयघोषात 75 तरुणांच्या पथकाने टिकाव, फावडे हाती घेतले. खड्डे घेऊन वृक्षारोपण सुरू केले. श्रमदानातून वृक्षारोपण व संगोपनाची चळवळ सुरू झाली. 

कोरोनामुळे या वर्षी गावातील यात्रा, उत्सव व हरिनाम सप्ताह रद्द झाला. त्यामुळे तरुण सरपंच डॉ. सुभाष काकडे यांनी यापुढे यात्रा-सप्ताहात लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याऐवजी लोकवर्गणी व लोकसहभागातून ग्रामविकासाची कामे करण्याचा संकल्प सोडला. 11 लाख रुपये लोकवर्गणी झाली. त्यातून मागील वर्षी ढगफुटी सदृश्‍य पावसामुळे फुटलेले दोन साठवण बंधाऱ्यांचे काम नुकतेच पूर्ण केले. आता वृक्षारोपण मोहीम हाती घेतली. 

वनखात्याकडून पाच हजार रोपे 

शेरी-चिखलठाण येथे वन खात्याची दीड हजार हेक्‍टर जमीन आहे. यापूर्वी वन खात्याने केलेल्या वृक्षारोपणात ज्या ठिकाणी झाडे जगली नाहीत, तेथे नवीन वृक्षलागवड करण्याचे ठरले. वन खात्याने कडूलिंब, बांबू, चिंच, करंजी, सिसम, आवळा, हळद या झाडांची पाच हजार रोपे उपलब्ध करून दिली. 

वृक्षलागवडीत पावसाचा व्यत्यय 

काल (बुधवारी) डॉ. संजय काकडे, सुभाष काकडे, बाळासाहेब काकडे, अनिल काकडे, आबासाहेब काकडे, पोपट काकडे, नानासाहेब काकडे, भीमराज काकडे, गंगाधर काकडे, सारंग काकडे, सागर काकडे, प्रकाश काकडे, दिलीप काकडे, श्रीरंग काकडे आदींसह 75 तरुणांनी श्रमदान केले. आज सकाळी वृक्षारोपणास सुरवात झाली. परंतु, जोरदार पावसामुळे काम थांबवावे लागले. 

बंधाऱ्यातील पाण्याचा वापर 

दोन हजार वृक्षलागवड झाली आहे. आज पावसामुळे काम खंडित झाले. येत्या दोन-तीन दिवसांत सर्व पाच हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होईल. उन्हाळ्यात ग्रामपंचायतीतर्फे टॅंकरची व्यवस्था करुन, झाडे जगविली जातील. त्यासाठी बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचा वापर केला जाईल. 
- डॉ. सुभाष काकडे, सरपंच, शेरी-चिखलठाण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com