युक्रेनमधून परतण्यासाठी धडपड

श्रीगोंद्यातील तिघांचा संघर्ष; विद्यार्थी हिमतीने करताहेत संकटांचा सामना
russia ukraine crisis Struggling for return from Ukraine Shrigonda
russia ukraine crisis Struggling for return from Ukraine Shrigondasakal

श्रीगोंदे : अचानक होणारे हवाई हल्ले, सगळीकडे हाहाकार व दहशत, एटीएममधील संपलेले पैसे, खाण्यासाठी काहीही नाही, डोक्यावर सारखे घोंगावणारे मरण... यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या श्रीगोंद्यातील तिघांचे हाल सुरू आहेत. हे विद्यार्थी मायदेशी परतण्यासाठी धडपडत आहेत. तब्बल पाच तास अंगावर बर्फ झेलत युक्रेनच्या सरहद्दीवर त्यांना थांबावे लागले.

युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले हे तीन विद्यार्थी आहेत. यात देवदैठण येथील तेजश्री बनकर, मढेवडगाव येथील निनाद शिंदे व भानगावचा महेश कुदांडे यांचा समावेश आहे. स्थिती गंभीर आहे, काहीही सांगू शकत नाही. मात्र, आम्ही सुखरूप आहोत, भारतीय असल्याचा अभिमान असून, आम्ही लवकरच मायदेशात येऊ, असा विश्वास या तरुणांनी ‘सकाळ’सोबत बोलताना व्यक्त केला.

महेश, निनाद व तेजश्री हे तिघेही वेगवेगळ्या शहरांत आहेत. यातील निनाद हा सध्या युक्रेनची सीमा ओलांडून रुमानियात पोचला. इतर दोघे मात्र आज सकाळपर्यंत युक्रेनमध्येच होते. दोघांनीही ते आज युक्रेनमधून बाहेर पडणार असल्याचे सांगितले. दुसऱ्यांचा जीव वाचविण्याच्या वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या या विद्यार्थ्यांना आता स्वतःचाच जीव वाचविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

निनादसोबत ''सकाळ''ने संवाद साधल्यावर अंगावर शहारा आणणारी परिस्थिती समोर आली. मी सुखरूप आहे. मात्र, त्यासाठी कठोर संघर्ष करावा लागला. रुमानिया सरहद्दीपर्यंत येण्यासाठी २२ तासांचा प्रवास केला. त्यादरम्यान कधीही हल्ले होऊ शकतात याची भीती होतीच. सरहद्दीवर आल्यावर तेथील भयानक परिस्थिती पाहून जीव मेटाकुटीला आला. तब्बल २८ तास आम्ही रुमानियात प्रवेशासाठी उभे होतो. तेथे कुणीही आमची मदत करीत नव्हते. तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले होते. त्यातच वरून पडणाऱ्या बर्फामुळे जीव जातो की काय असे वाटत होते. त्याही स्थितीत थांबून राहिल्याने सीमा ओलांडता आली, असे त्याने सांगितले.

महेश निघाला हंगेरीच्या दिशेने

महेश झापुर्झ्या येथे शिक्षण घेण्यासाठी गेला आहे. तो आज दुपारपर्यंत त्याच शहरात होता. तो म्हणाला, की आम्ही राहत असलेल्या ठिकाणी युद्धाच्या झळा पोचल्या नव्हत्या. मात्र, आज सकाळी आम्हाला निरोप आला, की तुम्ही पॅकिंग सुरू करा, तुमच्या देशात निघायचे आहे. विद्यापीठात जाणार आहे. तेथून रुमानिया अथवा हंगेरी देशाच्या सरहद्दीकडे जाण्याची शक्यता आहे.

तेजश्रीचे धाडस

तेजश्री बनकर हिच्याशी संपर्क झाला नाही. मात्र, तिचे वडील म्हणाले, ती सुखरूप आहे. आज ती भारताकडे निघण्याची शक्यता आहे. मुलगी असली तरी ती धाडशी आहे. तिच्याकडील पैसे संपले आहेत, तरीही ती आम्हालाच धीर देतेय. तिच्या परतण्याकडे आमच्या नजरा आहेत.

ते २८ तास...

निनाद शिंदे सांगत होता, रुमानियाच्या सरहद्दीवर येताना तेथील दोन्ही देशांच्या लोकांनी दाखविलेली माणुसकी सलाम करायला लावणारी होती. खाण्यासाठी पदार्थ, पिण्यासाठी पाणी देत ते घरच्यांप्रमाणे करीत होते. मात्र, आम्हाला २८ तास रांगेत राहायचे होते. त्यामुळे काही खाताही येत नव्हते आणि पाणीही पिता येत नव्हते. या सगळ्या स्थितीत स्थानिक लोकांना प्रशासन मदत करीत होते. आम्हाला मात्र त्यांच्याकडे केवळ पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com