शिर्डीत साईबाबांचे कोविड सेंटर झालंय सुरू

सतीश वैजापूरकर
Friday, 11 September 2020

रुग्णालयात प्राणवायू प्रणाली बसविण्यासाठी विखे पाटील यांनी स्थानिक विकास निधीतून 15 लाख रुपयांचा निधी दिला. सर्व खाटांजवळ रुग्णांसाठी प्राणवायूची सुविधा असेल.

शिर्डी ः बारा खाटांचा अतिदक्षता विभाग कक्ष व पाच व्हेंटिलेटर, अशी सुविधा असलेल्या साईबाबा संस्थानच्या कोविड रुग्णालयाचा प्रारंभ आज आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला. रुग्णालयाची क्षमता 50 खाटांची आहे. येत्या दोन-तीन दिवसांत रुग्णालयातून रुग्णसेवा सुरू होईल. त्यामुळे शिर्डी परिसरातील तातडीच्या उपचारासाठी बाहेर न्याव्या लागणाऱ्या रुग्णांची फरफट थांबू शकेल. 

रुग्णालयात प्राणवायू प्रणाली बसविण्यासाठी विखे पाटील यांनी स्थानिक विकास निधीतून 15 लाख रुपयांचा निधी दिला. सर्व खाटांजवळ रुग्णांसाठी प्राणवायूची सुविधा असेल. एक एमबीबीएस डॉक्‍टर व अतिदक्षता विभागतज्ज्ञ येथे उपलब्ध असेल. संस्थान रुग्णालयातील एम.डी. डॉक्‍टरची आवश्‍यकता भासल्यास उपलब्ध असतील. साईसंस्थानाच्या रुग्णालयातील परिचारीका व कर्मचारी येथे तैनात करण्यात आले. 

हेही वाचा - भाऊ फक्त आदेश द्या, कंगणाचं नाकच कापतो

कोविड रुग्णांसाठी आवश्‍यक औषधविक्रीसाठी दुकानदाराला परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी आवश्‍यक पत्र साईसंस्थानने तेथील औषध दुकानदारास आज दिले. पुढील दोन-तीन दिवसांत त्यास परवानगी मिळेल. या रुग्णालयासाठी 12 एमबीबीएस डॉक्‍टरांचे सहकार्य मिळावे, अशी मागणी साईसंस्थानने जिल्हा रुग्णालयाला केली. मात्र, याबाबत तेथील अधिकाऱ्यांनी असमर्थता व्यक्त करणारे पत्र साईसंस्थानला दिले. 
रुग्णालयाच्या उद्‌घाटनानंतर विखे पाटील यांनी कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या संस्थान कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी आपण पुढाकार घेतल्याचे विखे पाटील यांना सांगितले.

साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय नरोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, डॉ. स्वाती म्हस्के आदी उपस्थित होते. 

शिर्डीत रुग्णसंख्या वाढतेय 
भाविकांची संख्या मर्यादित ठेवून मंदिरे खुली करण्याबाबत सरकारी पातळीवर विचार सुरू असला, तरी शिर्डी परिसरात कोविड रुग्ण सातत्याने वाढत आहेत, ही काळजी करण्यासारखी बाब आहे. साईसंस्थान रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णसंख्येतही या आठवड्यात वाढ झाली. संस्थान कर्मचाऱ्यांनाही संसर्ग होत आहे. सिटी स्कॅनसाठी येणाऱ्या रुग्णात न्यूमोनियाचे लक्षणे दिसण्याचे प्रमाण वाढले आहे, असे निरीक्षण साईसंस्थान रुग्णालयातील डॉक्‍टरांनी नोंदविले आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sai Baba's Kovid Center has started