साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे निधन

सतीश वैजापूरकर
Saturday, 26 September 2020

साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे शनीवारी मध्यरात्री नाशिक येथील एका खासगी रूग्णालयात मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने निधन झाले. कोविड संसर्ग झाल्याने त्यांच्यावर उपचार सूरू होते.

शिर्डी (अहमदनगर) : साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे शनीवारी मध्यरात्री नाशिक येथील एका खासगी रूग्णालयात मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने निधन झाले. कोविड संसर्ग झाल्याने त्यांच्यावर उपचार सूरू होते. काल पहाटे अचानक त्रास सुरू झाल्याने त्यांच्या मेंदूवर छोटी शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. 

त्यांनी सुचविल्या नंतर चेन्नई येथील दानशुर साईभक्त के. व्ही. रमणी यांनी साईसंस्थानला एकशे दहा कोटी रूपये खर्च करून शिर्डीत दोन धर्मशाळा उभारून दिल्या. त्यांनी साईबाबांच्या जिवनावर लिहिलेल्या साई चरित्र दर्शन या पुस्तकाचे १४ भाषेत भाषांतर झाले. त्यातील नेपाळी भाषेतील पुस्तकाचे सहा महिन्यापूर्वी प्रकाशन झाले. 

कोविड संसर्ग होण्यापूर्वी त्यांनी साईसंस्थानच्या कोविड रूग्णालयास दानशुर साईभक्तांकडून मोठी मदत मिळवून दिली. तसेच गुरूस्थान आणि बाबांचे वास्तव्य असलेल्या द्वारकामाई मंदिराती इटालीयन मार्बल बसविण्यासाठी त्यांनीच दानशुर दाते के.व्ही.रमणी यांच्याकडून मदत मिळवून दिली. साईसंस्थानच्या रूग्णालयाला वेळोवेळी अर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. एका खासगी कंपनीकडून साईसंस्थानसाठी पिण्याच्या पाण्याचा साठवण तलाव बांधून घेतला. साईसंस्थानच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील अशी त्यांची कारकिर्द होती. 

प्रतिकूल परिस्थीती सोबत त्यांनी संघर्ष करून ते या पदा पर्यत पोचले. कुठलाही आधार नसल्याने संजीवनी कारखाना परिसरातील मारूती मंदिरात मुक्काम करून त्यांनी ग्रंथपालाची पदवी घेतली. संजीवनी शैक्षणीक संकुलात ग्रंथपाल म्हणून रूजू झाले. सोळा वर्षापूर्वी ते साईसंस्थान मध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून रूजू झाले. आपल्या वैशिष्टपूर्ण कामगारीच्या माध्यमातून त्यांनी या पदाची उंची वाढवीली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sai Sansthan Public Relations Officer Mohan Yadav passed away