सैराट फैम ‘प्रिन्स’ला अटक कधी? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suraj pawar

मंत्रालयात सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीतील आणखी एका आरोपीला काल (गुरुवारी) रात्री साडेअकरा वाजता राहुरी पोलिसांनी अटक केली.

सैराट फैम ‘प्रिन्स’ला अटक कधी? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

राहुरी - मंत्रालयात सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीतील आणखी एका आरोपीला काल (गुरुवारी) रात्री साडेअकरा वाजता राहुरी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात आतापर्यंत चार जणांना अटक झाली आहे. सुरज पवार उर्फ सैराट चित्रपटातील प्रिन्स याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.

विजय बाळासाहेब साळे (वय ३७, रा. खडांबे बु., ता. राहुरी) असे काल (गुरुवारी) मध्यरात्री अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला व आरोपी ओंकार नंदकुमार तरटे (रा. संगमनेर) या दोघांना आज (शुक्रवारी) राहुरी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यापूर्वी अटक केलेले दत्तात्रेय अरुण क्षीरसागर (३१, रा.दत्तनगर, नाशिक) व आकाश विष्णू शिंदे (रा. संगमनेर) या दोघांची पोलीस कोठडी आज (शुक्रवारी) संपल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

काल रात्री अटक केलेला आरोपी साळे राहुरी तालुक्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांची माहिती आरोपी शिंदे याला पुरवीत होता. ती माहिती शिंदे मार्फत आरोपी क्षीरसागर याला मिळत होती. असे पोलीस तपासात समोर आल्याचे पोलीस निरीक्षक दराडे यांनी सांगितले. साळे याला अटक झाल्याची वार्ता समजतात वांबोरी (ता. राहुरी) व श्रीरामपूर येथील काही तरुण राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन आले. साळे याने नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याचे तरुणांनी सांगितले. परंतु, रात्री उशिरापर्यंत त्यांच्या गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.

दरम्यान, आरोपी सुरज पवार उर्फ सैराट चित्रपटातील आर्चीचा भाऊ प्रिन्स याला ताब्यात घेण्यासाठी सोलापूरच्या दिशेने पोलीस पथक रवाना झाल्याने, त्याच्यावर अटकेची टांगती तलवार उभारली आहे.

आरोपीचा न्यायालयात ड्रामा...

राहुरी न्यायालयात आज (शुक्रवारी) गुन्ह्यातील चारही आरोपींना हजर करण्यात आले. यावेळी आरोपी आकाश शिंदे याने गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा यांनी पोलीस कोठडीत बेदम मारहाण केल्याचा आरोप केला. त्यामुळे, राहुरी न्यायालयाने आरोपी शिंदे याची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे, पोलीस वर्तुळात खळबळ उडाली. राहुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी आरोपीला मारहाण झाली नसल्याचा अहवाल दिल्यावर तपासी अधिकारी नार्‍हेडा यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Web Title: Sairat Fame Prince Suraj Pawar Arrested Police Gave Important Information Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..