Ahmednagar : गड-किल्ल्यांचे संवर्धन करणार ; छत्रपती संभाजीराजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sambhaji raje

Ahmednagar : गड-किल्ल्यांचे संवर्धन करणार ; छत्रपती संभाजीराजे

संगमनेर : किल्ले रायगडाचे राज्य शासनाने शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन केले आहे. मात्र, छत्रपती शिवरायांच्या, राज्यातील असंख्य गड-किल्ल्यांची देखभाल- दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली आहे. त्यापैकी ३० कड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम गड-किल्ले फेडरेशन या संस्थेच्या माध्यमातून हाती घेतले आहे. त्यात संगमनेर तालुक्यातील पेमगिरीच्या शहागडाचा समावेश केल्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली.

पेमगिरी येथे राष्ट्रीय छावा संघटनेच्या मेळाव्यानिमित्त आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की शहाजीराजे व राजमाता जिजाऊंचा पदस्पर्श लाभलेल्या पेमगिरीच्या शहागडाच्या दर्शनाने वेगळी अनुभूती मिळाली आहे. या गडाचे शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन होण्याची आवश्यकता आहे. शिवरायांचे स्मारक किंवा गड-किल्ले खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्यासाठी त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

राज्य सरकारने रायगडाचे संवर्धन शास्त्रोक्त पद्धतीने केले, त्याप्रमाणे इतर गड-किल्ल्यांचे संवर्धन का होत नाही, असा सवाल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. दुरवस्था झालेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी काही अडचण येत असल्यास तेही सांगा, आम्हाला तुमच्याकडून कुठल्याही प्रकारच्या आर्थिक मदतीची गरज नाही.

गड-किल्ले संवर्धनासाठी स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील ३० गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्याचे काम हाती घेतले आहे. आम्हाला केंद्र सरकारची कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आम्ही वर्षभर सर्व गड-किल्ल्यांचे संवर्धन करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्यासमवेत राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रांताध्यक्ष गंगाधर काळकुटे, संगमनेर दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख, सोमनाथ गोडसे, प्रवीण कानवडे उपस्थित होते.

राज्य सरकारचे संवर्धनाकडे दुर्लक्ष

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यात जिंकलेल्या व उभारलेल्या गड-किल्ल्यांचा ताबा सध्या राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाकडे आहे. मात्र त्या किल्ल्यांची सध्या मोठी दुरवस्था झाली असून, राज्य सरकारच्या उदासीन भूमिकेवर संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.