शिर्डीकरांसाठी स्वतंत्र साईदर्शनाची सोय करा ; संदीप कुलकर्णी यांची तदर्थ समितीकडे मागणी

सतीश वैजापूरकर
Wednesday, 6 January 2021

आजवर साईसंस्थानने पंचक्रोशीतील भाविकांसाठी सुलभ दर्शनाची उत्तम व्यवस्था केली होती. वाढत्या गर्दीमुळे त्यावर मर्यादा येऊ लागल्या. त्यातून ग्रामस्थ व प्रशासनात संघर्ष होऊन वातावरण गढूळ झाले.

शिर्डी (अहमदनगर) : शिर्डी परिसरातील भाविकांचे साईबाबा पूर्वापार दैवत आहे. आजवर साईसंस्थानने पंचक्रोशीतील भाविकांसाठी सुलभ दर्शनाची उत्तम व्यवस्था केली होती. वाढत्या गर्दीमुळे त्यावर मर्यादा येऊ लागल्या. त्यातून ग्रामस्थ व प्रशासनात संघर्ष होऊन वातावरण गढूळ झाले. साईसंस्थानच्या प्रतिमेवर त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे पाहून पूर्वीप्रमाणे स्थानिक भाविकांसाठी मोफत व स्वतंत्र दर्शन, तसेच आरतीची व्यवस्था करावी, अशी मागणी माहिती अधिकारातील कार्यकर्ते संदीप कुलकर्णी व साईसंस्थानचे माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी तदर्थ समितीच्या अध्यक्षांकडे केली आहे.
 
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

पत्रात म्हटले आहे, की शिर्डी परिसरातील भाविकांसाठी पूर्वीप्रमाणे गावकरी दरवाजा दर्शनासाठी खुला ठेवावा. त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग, आरती व दर्शनाचे मोफत पास पूर्वीप्रमाणे मिळावेत. बाबांच्या हयातीपासून दर गुरुवारी शिर्डीची वारी करणारे शेकडो भाविक आहेत. त्यांच्या सुलभ दर्शनाची व्यवस्था पूर्वीप्रमाणे करणे गरजेचे आहे. या पत्राच्या प्रती तदर्थ समितीच्या सर्व सदस्यांना पाठविल्या आहेत.
 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पूर्वीची सुलभ दर्शन व्यवस्था बंद असल्याने, गेल्या काही दिवसांपासून ग्रामस्थ व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांची कुंचबणा झाली. त्यातून वादाचे प्रसंग घडतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांना, तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हे अनुभव आले. त्यातून हा विषय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यत नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कुलकर्णी व शेळके यांच्या पत्राला महत्त्व आले आहे. 

संदीप कुलकर्णी म्हणाले, की बाबांच्या हयातीपासून स्थानिकांच्या साईदर्शनाची परंपरा व प्रथा साईसंस्थानने मोडीत काढू नये. पंचक्रोशीतील भाविकांच्या साईदर्शनावरून वादंग आणि संघर्ष निर्माण होणे योग्य नाही. त्यातून साईसंस्थानाच्या प्रतिमेवर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी तदर्थ समितीने योग्य तो निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sandeep kulkarni has demanded an ad hoc committee to provide separate side sightings for devotees in shirdi