संगमनेर : वेल्हाळे शिवारात दारुसह 69 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमनेर : वेल्हाळे शिवारात दारुसह 69 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर : वेल्हाळे शिवारात दारुसह 69 लाख 13 हजारांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर (जि. अहमदनगर) : गोवा राज्यात निर्मीत मद्याची महाराष्ट्र राज्यात चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होणार असल्याच्या गुप्त माहितीनुसार, पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने, संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावाच्या शिवारात नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर सापळा लावला होता. या कारवाईत गुरुवार ( ता. 11 ) रोजी पहाटे पाच वाजता संशयित वाहन अडवून तपासणी केली असता, विदेशी मद्य व बिअरचे सुमारे 995 खोके आढळून आले. या कारवाईत कन्टेनरसह समारे 69 लाख 13 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन, चालकाला अटक केली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी, पुणे विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक, दिगंबर शेवाळे यांच्या पथकाने संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावाच्या शिवारात ही कारवाई केली. माहिती मिळालेले संशयीत वाहन ( एमएच. 04 एचडी.8892 ) थांबवून चालकाकडे चौकशी केली असता, त्यात कापसाचे सुत असल्याचे सांगत, त्याने एव्हीजी लॉजीस्टीक लि. दिल्ली या ट्रान्स्पोर्ट कंपनीची बिल्टी व खजूरीया टेक्सटाईल मिल नवी मुंबई यांची इनवाईस कॉपी दाखविली.

हेही वाचा: राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; 'लालपरी'चा मार्ग होणार का खुला?

मात्र वाहनाची तपासणी करताना, मागील बाजूच्या हौद्यात गोवा राज्य निर्मीत व विक्रीस परवानगी असलेले रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीच्या 799 खोक्यात 180 मिलीच्या 38,352 सिलबंद बाटल्या, 96 खोक्यात किंग फिशर स्ट्राँग बिअरच्या 500 मिलीच्या 2304 सिलबंद बाटल्या असा अवैध मद्यसाठा आढळला. पथकाने कंटेनरसह सुमारे 69 लाख 13 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन, चालक सुर्यनारायण रामचंद्र शिरसाट ( 35 ) रा. सम्राट अशोकनगर, विलेपार्ले (पुर्व) सहार पी अँण्ड टी कॉलनी मुंबई याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 अ,ई, 81, 83, 90,103 व 108 तसेच भारतीय दंड संहीता 420 चे कलम 1860, 465, 468 व 471 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या कारवाईत भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक शहाजी गायकवाड, संजय बोधे, एस.एन.इंगळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश सुळे व जवान प्रताप कदम, अमर कांबळे, अहमद शेख, भरत नेमाडे, शशांक झिंगळे, सतीश पोंधे, अनिल थोरात, प्रविण पुसावळे व तानाजी जाधव आदींनी सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक शहाजी गायकवाड करित आहेत.

loading image
go to top