डाळींबला उच्चांकी दर; संगमनेरमध्ये प्रति क्रेटला मिळाले....

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलावात डाळींबलाच्या भावाने उच्चांक केल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरु होती.

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलावात डाळींब फळाला प्रति क्रेट दोन हजार 121 असा दर मिळाला असून, एक नंबर डाळींबाच्या भावाने उच्चांक केल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरु होती. 

हेही वाचा : घोडेगावकडे भरधाव वेगात जाणारा टेम्पो पोलिसांनी अडवला... त्यात पाहिले तर...
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारात आज नगर येथील विशाल पवार या डाळींब उत्पादक शेतकऱ्याने त्याचा माल विक्रीसाठी आणला होता. प्रथम श्रेणीच्या या मालाला प्रति क्रेट सुमारे एकवीसशे एकवीस रुपये असा उच्चांकी भाव मिळाल्याने डाळींब उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे शेतमाल विक्री बाहेर करण्यास अनेक अडचणी येत असताना सुध्दा संगमनेर बाजार समिती मधील सर्व डाळींब आडते व व्यापारी शेतकऱ्याच्या मालाला चांगले भाव मिळवुन देत असल्याचे शेतकरी आवर्जुन सांगतात. पावसामुळे डाळींब या पिकाची खुप मोठी हानी झालेली दिसुन येत असून, सततच्या पावसामुळे फळावर मोठेमोठे ठिपके पडुन फळ खराब होत आहे.

पावसामुळे शेतमाल खराब होण्यापेक्षा उत्पादित माल बाजारभावाची चिंता न करता बाजारात आणला जात आहे. इतर ठिकाणच्या तुलनेत संगमनेर बाजार समितीत कांदा, टोमॅटो, डाळींब आदी उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी माल विक्रीला आणताना योग्य पध्दतीने वर्गिकरण करुन विक्रीसाठी आणण्याचे आवाहन सभापती शंकरराव खेमनर, सचिव सतिश गुंजाळ व संचालक मंडळाने केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangamner Agricultural Produce Market Committee pomegranate is priced at Rs 2121