esakal | संगमनेर : बैलांची चोरी करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

संगमनेर : बैलांची चोरी करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संगमनेर : पोळा या मानाच्या सणाच्या दिवशीच दरेवाडी येथून बैल जोडीची चोरी करुन चक्क कसायाला विकण्याचा प्रयत्न झाल्याची घटना आज घडली. बैलांच्या मालकाने तालुक्यातील निंबाळे परिसरात बैलजोडीसह संशयित चोरट्यांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील दरेवाडी येथील दत्तात्रय सखाराम इघे, रा. दरेवाडी, ता. संगमनेर या शेतकऱ्याची सुमारे दोन लाख रुपये किंमतीची खिलारी बैलांची जोडी आज पहाटे अडीचच्या सुमारास राहत्या घरासमोरुन पिकअपमधून चोरुन नेली. पहाटे बैल चोरीला गेल्याचे समजताच दत्तात्र इघे यांनी त्यांच्या मित्र व नातेवाईकांसह तालुक्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला. शहराजवळच्या निंबाळे परिसरात त्यांना दोन युवक बैलजोडीसह दिसल्याने, त्या संशयितांना त्यांनी विचारणा केली असता, त्यांनी इघे यांना धक्काबुक्की केली.

हेही वाचा: पुणे : बाळ संगोपन रजेवरील महिला पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या

ही बैलजोड कसायाला विकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ही घटना समजताच निंबाळे येथील काही ग्रामस्थांनी त्यांना अटकाव करुन, प्रथम संगमनेर शहर पोलिस ठाण्याला कळवले. पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी काँस्टेबल साईनाथ तळेकर व साईनाथ पवार यांना पाठवून त्यांना ताब्यात घेतले. हे प्रकरण घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने त्या संशयितांना घारगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या प्रकरणी दत्तात्रय इघे यांच्या फिर्यादीवरुन बाळासाहेब पांडुरंग फड, ( रा. दरेवाडी, ता. संगमनेर ) व बाळू मारुती कोळेकर ( रा. डिग्रस, ता. संगमनेर ) या दोघांसह त्यांच्या दोन साथीदारांविरोधात चोरी व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सन 1976 व सुधारीत कायदा सन 1995 चे कलम 5 (अ) (ब), 9 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार के. एम. देशमुख पुढील तपास करीत आहेत.

loading image
go to top