स्वच्छ भारतमध्ये सहा राज्यातून संगमनेरचा पाचवा क्रमांक

आनंद गायकवाड
Thursday, 20 August 2020

केंद्र सरकार पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सेव्हन स्टार स्पर्धेत संगमनेर नगरपालिका सहभागी झाली होती.

संगमनेर (अहमदनगर) : केंद्र सरकार पुरस्कृत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सेव्हन स्टार स्पर्धेत संगमनेर नगरपालिका सहभागी झाली होती. यात संगमनेर नगरपालिकेने राबवलेल्या ओला व सुका तसेच प्लॅस्टिक कचरा वर्गिकरण, घंटागाडी, कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मीती, शहरातील गार्डन, शौचालये व एक रुपयात एक लिटर स्वच्छ पाणी अशा विविध उपक्रमांची देशपातळीवर दखल घेतली असून, स्वच्छ सर्व्हेक्षणात पश्‍चिम विभागातील सहा राज्यांमधून संगमनेर नगरपालिकेला पाचवा क्रमांक मिळाला आहे. 

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या नगरपालिकेने सातत्याने लोकाभिमुख कामांचा ठसा राज्यात उमटविला आहे. नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांचा सातत्याने स्वच्छतेच्या जनजागृतीचा ध्यास आहे. भुमिगत गटारी, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, वृक्षारोपण आदी विकास कामांचा झपाटा सुरु आहे. यापूर्वी संगमनेर नगरपालिकेला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा दोनदा पुरस्कार मिळाला आहे. तसेच गतीमान प्रशासन म्हणूनही संगमनेर नगरपालिकेला पुरस्कारासह फस्ट स्टार मानांकन व ओडीएफचे प्लस प्लस प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. 

केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियान स्पर्धेत संगमनेर नगरपालिका सहभागी झाली होती. या स्पर्धेत राज्यातील 323 नगरपालिकांनी सहभाग नोंदवला होता. संगमनेर नगरपालिकेचे कर्मचारी 24 तास स्वच्छतेसाठी काम करीत असून, कोरोना काळातही सर्वांनी अधिक चांगल्या पध्दतीने काम केले आहे. या सर्व्हेक्षणात शहरातील 16 हजार नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. या सर्वांची दखल घेत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश व गोवा या राज्यांमधील सहभाग घेतलेल्या सर्व नगरपालिकांमधून संगमनेर नगरपालिकेला 5 वा क्रमांक मिळाला आहे. 

या पुरस्काराबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपनगराध्यक्ष सुमित्रा दिड्डी, आरोग्य सभापती नितीन अभंग, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर आदींसह सर्व विद्यमान नगरसेवकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

नगराध्यक्ष दुर्गा तांबे म्हणाल्या, कचरामुक्त संगमनेर शहरासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था व नागरिकांनी तसेच सर्व नगरसेवकांनी दिलेल्या सहकार्यामुळे हा सन्मान मिळाला आहे.

मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर म्हणाले, नगरपालिकेने केलेल्या उत्कृष्ठ कार्याची दखल घेवून प्राप्त झालेल्या पुरस्काराचा अभिमान आहे. याकामी नगरपालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडुन मोलाची मदत दिली आहे. भविष्यातही संगमनेर नगरपालिका अशाच प्रकारच्या कार्यातून देशपातळीवर ठसा उमटवील.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangamner ranks 5th out of six states in clean India