संगमनेर : विवाहित प्रेयसीची आत्महत्या; प्रियकराचा स्मशानात निर्घृण खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

attemt to suicide

संगमनेर : विवाहित प्रेयसीची आत्महत्या; प्रियकराचा स्मशानात निर्घृण खून

संगमनेर: प्रियकराच्या घरचे सातत्याने करीत असलेली दमदाटी, शिवीगाळ व मारहाणीला वैतागल्याने तालुक्यातील एका गावातील ३१ वर्षीय विवाहितेने सोमवारी पहाटे विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. तिने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरून घारगाव पोलिसांनी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. मृत विवाहितेच्या चितेचा अग्नी शमण्यापूर्वीच तिचा पती व दोन दिरांनी प्रियकराला रात्री साडेअकराच्या सुमारास काठ्या व तीक्ष्ण हत्याराने ठार केले. ही घटना आज सकाळी उघडकीला आली. या दुहेरी प्रकरणामुळे तालुक्याचा पठार भाग हादरून गेला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी तालुक्यातील एका गावातील महिलेचे ३७ वर्षांच्या पुरुषाशी प्रेमसंबंध होते. त्याच्या घरच्यांचा या प्रकरणाला विरोध होता. प्रियकराच्या घरचे, तसेच तिच्या घरच्यांनाही हे संबंध मान्य नव्हते. सोमवारी ता. १४ मध्यरात्री दोनच्या सुमारास विषारी औषध घेऊन तिने आत्महत्या केली. तत्पूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीवरून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल दहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. घारगाव पोलिसांनी प्रियकराची आई व बहिणीला अटक केली. त्यानंतर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज सकाळी तिला सावडण्याच्या विधीसाठी स्मशानात गेलेल्या नातेवाइकांना सकाळी नऊच्या सुमारास, अंत्यसंस्काराच्या ओट्याजवळ प्रियकराचा मृतदेह आढळला. त्याला बेदम मारहाण करून ठार केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.या घटनेची माहिती समजताच घारगाव पोलिस व उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांनी घटनास्थळ गाठले. याप्रकरणी प्रियकराच्या नातेवाइकांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून मृत महिलेचा पती, दिरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पोलिस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत.