१० लाखाच्या गांजासह मुद्देमाल जप्त; तीन जणांना अटक

आनंद गायकवाड 
Monday, 21 September 2020

मालदाड रोडवरील कटारिया नगर येथे संगमनेर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत, सुमारे सहा लाख रुपये किंमतीचा गांजा व इतर साहित्यासह 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.

संगमनेर (अहमदनगर) : शहराच्या हद्दीतील मालदाड रोडवरील कटारिया नगर येथे संगमनेर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत, सुमारे सहा लाख रुपये किंमतीचा गांजा व इतर साहित्यासह 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. 

रविवारी (ता. 20 ) दुपारी केलेल्या या कारवाईत जययोगेश्वर दगु गायकवाड (वय 24, मुळ रा. रांजणगाव देशमुख, हल्ली रा. शंकर टाऊनशिप, कटारीयानगर, संगमनेर) दीपक सुरेश तुपसुंदर (वय 34, खांडेश्वर मंदिराजवळ, खांडगाव, ता. संगमनेर) व विशाल निवृत्ती आरणे (वय 26, मुळ रा. रांजणगाव देशमुख, हल्ली रा. दिवेकर एजन्सीजवळ मालदाड रोड, संगमनेर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरा पोलिस उपनिरीक्षक राणा परदेशी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील कटारीयानगर परिसरातील शंकर टाऊनशिप, गल्ली क्रमांक 1 मधील काही तरुणांकडे अमली पदार्थ असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत, पोलिस निरीक्षक सुनिल पाटील, सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने रविवारी दुपारी कारवाई केली. संशयास्पद घरात तपासणी करताना स्वयंपाकगृहातील कोपऱ्यात चार गोण्या आढळल्या.

त्या गोण्यांमध्ये 77 किलो 335 ग्रॅम वजनाचा, 1 लाख 84 हजार रुपये किंमतीचा काळपट हिरवट पाने, काड्या व बिया असलेल्या वनस्पतीचे शेंडे असलेला उग्र वासाचा गांजा हा अमली पदार्थ, वजनकाटा, काही छोट्या पिशव्या, चार गोण्या असा 6 लाख 16 हजार 944 रुपयांचा मुद्देमाल व 3 लाख 10 हजार रुपये किंमतीची मोटार (एमएच 14 बीआर 9487 व 60 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल असा, 9 लाख 86 हजार 944 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरा अमली औषधे द्रव्य मनप्रभावी पदार्थ अधिनियमाच्या कलमान्वये संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangamner taluka police seized 10 lakh cannabis and arrested three persons