कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवलेल्या 54 गोवंशाची सुटका

आनंद गायकवाड
Monday, 3 August 2020

राज्यात गोवंशाच्या हत्येला बंदी असतानाही कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या 52 गायींची सुटका संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने केली.

संगमनेर (अहमदनगर) : राज्यात गोवंशाच्या हत्येला बंदी असतानाही कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या 52 गायींची सुटका संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने केली. 
शनिवार ( ता. 01 ) रात्री केलेल्या दोन कारवाईत पोलिसांनी सुमारे 10 लाख रुपयांची गोवंशाची जनावरे हस्तगत केली आहेत. शहरातील मदिना नगर व जमजम कॉलनी परिसरात दोन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस काँस्टेबल सागर धुमाळ यांच्या फिर्यादीवरुन कलीम सलीम खान ( कुरेशी) (वय 20, रा. मदिना नगर, संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या ताब्यातून मदिनानगर काटवनातून पाच गोवंशाची जनावरे ताब्यात घेण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत समीर कुरेशी (रा. भारत नगर, संगमनेर) व कमरअली कुरेशी (रा. मदिना नगर, संगमनेर) या दोघांच्याविरोधात पोलिस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मदिना नगर व जमजम कॉलनी परिसरात कत्तलीच्या उद्देशाने मोठ्या संख्येने गोवंश जनावरे निर्दयतेने बांधून ठेवली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांना मिळाली. कारवाईसाठी गेलेले पोलिस उपनिरीक्षक रोहिदास माळी व पथकाला मदिना नगर येथील काटवनात पाच गोवंश जनावरे निर्दयतेने बांधल्याचे दिसून आले. तर जमजम कॉलनी येथे समीर कुरेशी यांच्या वाड्यातून 49 जनावरे ताब्यात घेण्यात आली.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangamner taluka police took action against three and released 54 cows