विनापरवाना विवाह सोहळा अंगलट; ‘यांच्या’वर गुन्हे दाखल, मात्र हॉटेलचालक सुटला

आनंद गायकवाड
Saturday, 15 August 2020

कोरोनाच्या पार्श्वमूमीवर प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाने विवाहमधील गर्दीच्या सोहळ्यांवर कडक निर्बंध घातले आहेत.

संगमनेर (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वमूमीवर प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाने विवाहमधील गर्दीच्या सोहळ्यांवर कडक निर्बंध घातले आहेत. मात्र तरीही प्रशासनाची परवानगी न घेता गुरुवारी (ता. 13) तालुक्यातील सायखिंडी शिवारातील कृष्णा गार्डन येथे झालेल्या विवाह सोहळ्यातील वधु वरांच्या माता पित्यावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र हॉटेल चालकाला यातून वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

देशासह राज्यात सुरू असलेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर मोठी बंधने आली आहेत. विवाहासारख्या समारंभासाठी नियमांचे पालन करून सोहळा साजरा करण्याचा दंडक तहसीलदारांनी घालून दिलेला असतानाही, गुरुवारी ( ता. 13 ) रोजी संगमनेर तालुक्यातील सायखिंडी गावाच्या शिवारात असलेल्या पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल कृष्णा गार्डन येथे सकाळी तालुक्यातील जाखुरी व अकोले तालुक्यातील कोतुळ येथील वधुवरांचा विवाह सोहळा धामधुमीत पार पडला.

मात्र या सोहळ्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार वधू किंवा वर पक्षाने प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती. परवानगी नसतानाही संबंधित हॉटेल मालकाने त्यांना जागा उपलब्ध करून दिली होती. या विवाह सोहळ्याला नियमापेक्षा जास्त गर्दी असूनही, वऱ्हाडी मंडळींना मास्क वापरण्याचे किंवा सामाजिक अंतराचे भान राखण्याचा पूर्ण विसर पडला होता.

ही बाब समजताच सायखिंडी येथील ग्रामसुरक्षा समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता. या विवाह सोहळ्यात कोरोना सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या समितीच्या सदस्यांनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विवाह सोहळ्याची संगमनेर तालुका पोलिस ठाण्याला माहिती दिली.

या माहितीवरून तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार इस्माईल शेख यांनी स्वतः तक्रार दाखल करीत वधू-वराच्या माता-पित्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 269, 270, 188 67 तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 चे कलम 234 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Sangamner taluka son and father filed a FIR for wedding without a license