
Sanjay Raut : सीमाभागात मुद्दाम वाद
शिर्डी : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज अवमान प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाजप सरकार हे केंद्र सरकारच्या मदतीने सीमा भागात विविध वाद मुद्दाम निर्माण करीत आहेत. योजनाबद्ध पद्धतीने हे सुरू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याबाबत एक शब्द बोलायला तयार नाहीत,’’ अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
राऊत यांनी कुटुंबीयांसह आज साईसमाधीचे दर्शन घेतले. साईसंस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. संजय राऊत म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतलेल्या भूमिकेस आपला पाठिंबा आहे. मात्र, ते ज्या पक्षात आहेत, त्या भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा सपाटा लावला आहे.
गद्दार शेपट्या घालतात
‘‘जे गद्दार आहेत, ते आम्हाला शिव्या देतात. त्यांनी राज्यपाल भवनाबाहेर उभे राहून शिव्या द्यायची हिंमत दाखवावी. कर्नाटकचे मुख्यमंत्री घुसखोरी करतात. त्यांच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत दाखवावी. तेथे हे गद्दार शेपट्या घालतात,’’ असा टोला संजय राऊत यांनी मारला. मी शंभर दिवस तुरुंगात होतो. मात्र, त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढले. शिवसेना हा लढणाऱ्यांचा पक्ष आहे. कुणापुढे गुडघे टेकवायचे नाहीत, अशी शिकवण आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. तुरुंगात असताना घरच्या मंडळींनी साईबाबांना साकडे घातले होते. त्यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी सहकुटुंब आलो, असे ते म्हणाले.