याला म्हणतात राजकीय खेळी ः लिंपणगावात बहुमत होतं पाचपुते गटाला, सरपंच झाले नागवडेंचे

संजय आ. काटे
Tuesday, 9 February 2021

लिंपणगावात स्पष्ट बहुतमत पाचपुते गटाकडे होते. परंतु ऐनवेळी नागवडे गटाने बाजी पलटवली.

श्रीगोंदे : लिंपणगाव येथे सतरा सदस्यांपैकी अकरा सदस्य आमदार बबनराव पाचपुते गटाचे विजय झाले होते. सरपंच  व उपसरपंच त्यांच्या गटाचे होतील याची केवळ औपचारिकता होती. मात्र, घडले उलटेच.

सरपंच पदाच्या निवडणुकीत पाचपुते गटाच्या शोभा कोकाटे यांचा शुभांगी उदयसिंह सूर्यवंशी यांनी एका मताने पराभव केला, तर उपसरपंच पदाच्या निवडणुकीतही अरविंद कुरुमकर यांनी बाजी मारत नागवडे गटाने सरशी साधली.

लिंपणगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या आज झालेल्या सरपंच उपसरपंच पदाच्या निवडीत मोठा उलट खेळ पाहायला मिळाला. या निवडणुकीत स्पष्ट  बहुमत आमदार पाचपुते यांच्या गटासोबत होते.  मात्र प्रत्यक्षात एका मताने पाचपुते गटाचा सरपंच व उपसरपंच पद हुकले.

काँग्रेस नेते राजेंद्र नागवडे यांचे कट्टर समर्थक असणारे उदयसिंह सूर्यवंशी यांनी त्यांच्या पत्नी शुभांगी यांना सरपंच पदाच्या उमेदवारीत उतरवले.  

पाचपुते गट गाफील

स्पष्ट बहुमत असल्याने आमदार पाचपुते गटाकडे ही निवडणूक ही ग्रामपंचायत जाईल, याबाबत कुणाच्याही मनात शंका नव्हती. पण प्रत्यक्ष मतदानात मात्र पाचपुते गटासाठी होत्याचे नव्हते झाले. पाचपुते गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार कोकाटे यांना आठ तर नागवडे गटाच्या सुर्यवंशी यांना नऊ मते मिळाली.

उपसरपंच पदासाठी पाचपुते गटाकडून विपुल रोडे तर नागवडे गटाकडून अरविंद कुरुमकर यांच्यातही हीच आकडेवारी राहिली. परिणामी स्पष्ट बहुमत असतानाही ग्रामपंचायत हातातून निसटल्याची वेळ आमदार पाचपुते गटावर आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarpanch Deputy Sarpanch of Nagwade group at Limpangaon