हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवारांनी सत्ता आणली पण सरपंचपद गेलं

दत्ता इंगळे
Thursday, 28 January 2021

आतापर्यंत गावाने एकमुखी पोपटरावांनाच सरपंच मानलं. कोणतंही आरक्षण निघाले तरी कारभार त्यांच्याकडेच असायचा. विकासकामाला खीळ बसायला नको म्हणून असा निर्णय घेतला जात होता.

नगर तालुका ः आदर्श गाव हिवरे बाजारच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. तिकडे औरंगाबादेत भास्करराव पेरे यांच्या पाटोदे गावात जे घडलं ते पोपटरावांच्या हिवरे बाजारमध्ये नाही झालं. त्यांनी एकहाती सत्ता आणून विरोधकांना नामोहरम केलं.

आतापर्यंत गावाने एकमुखी पोपटरावांनाच सरपंच मानलं. कोणतंही आरक्षण निघाले तरी कारभार त्यांच्याकडेच असायचा. विकासकामाला खीळ बसायला नको म्हणून असा निर्णय घेतला जात होता.

दरम्यान, यापूर्वी 2005पासून सलग तीन वेळा सरपंचपदाचे आरक्षण वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी जाहीर झाले होते. मात्र, ग्रामस्थांनी सरपंचपद रिक्त ठेवत, गावाचा कारभार एकमुखाने पोपटराव पवार यांच्यावरच सोपविला होता. आता यंदा सरपंचपद महिलेसाठी राखीव निघाल्याने गावकरी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा - नीलेश लंके यांचे घर पाहून पालकमंत्री अचंबित

राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृतिसमितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचे पॅनल यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले. मात्र, त्यामुळे गेल्या 30 वर्षांची बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीची परंपरा खंडित झाली.

यंदाच्या निवडणुकीत विरोधक निर्धाराने रिंगणात उतरले, मात्र ते आपली अनामत रक्कमही वाचवू शकले नाहीत. गावात गेल्या 30 वर्षांत पोपटराव पवार यांनी राबविलेल्या सप्तसूत्री कार्यक्रमाचे व सामाजिक कार्याचे राज्यासह देशभरातील ग्रामपंचायतींनी अनुकरण केले आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sarpanch post at Hiware Bazar for women reserved class