म्हणून नगर जिल्हा परिषदमधील ग्रामसेवक समाधानी

दौलत झावरे
Wednesday, 22 July 2020

कोरोनाच्या कालावधीत प्रशासकीय बदल्या करण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामसेवक युनियतर्फे सरकारकडे करण्यात आली होती.

नगर : कोरोनाच्या कालावधीत प्रशासकीय बदल्या करण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामसेवक युनियतर्फे सरकारकडे करण्यात आली होती. परंतु ग्रामविकास खात्याने बदल्यांचे धोरण राबविल्याने बदल्या गैरसोयी होतात की काय, अशी भीती ग्रामसेवकांना वाटत होती. परंतु जिल्हा परिषद प्रशासनाच्या सकारात्मक धोरणामुळे ग्रामसेवकांची प्रक्रियेत बदल्या झाल्याने सर्वांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे यंदा प्रशासकीय बदल्या रद्द करून विनंती बदल्या करण्यात याव्यात, अशी भूमिका ग्रामसेवक युनियनने केली होती. या संदर्भात ग्रामविकास मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. परंतु प्रशासनाने यंदा प्रशासकीय बदल्या करण्याचे धोरण राबविले. त्यामुळे ग्रामसेवकांमध्ये गैरसोयीच्या बदल्या होणार असल्याची भीती निर्माण झाली. परंतु जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजश्री घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखीलकुमार ओसवाल यांनी सकारात्मक निर्णय घेत ग्रामसेवकांच्या प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्या करताना गैरसोय होणार नाही, अशी भूमिका घेऊन प्रक्रिया राबविली.

दुसऱ्या दिवशी 73 बदल्या
जिल्हा परिषदेतील 33 संवर्गातील बदली प्रक्रियेस मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत, शिक्षण व महिलाबालकल्याण विभागातील 73 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात झाल्या. यामध्ये प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली.

ग्रामविकास खात्याच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने बदलीची प्रक्रिया सुरु केलेली असून पहिल्या दिवशी 40 बदल्या करण्यात आल्या होत्या. आज झालेल्या बदल्यात १० प्रशासकीय, 30 विनंती व 33 आपसी बदल्यांचा समावेश आहे.

यामध्ये ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्या झालेल्या नसून ग्रामसेवकांच्या चार विनंती व 25 आपसी व ग्रामविकास अधिकार्यांच्या दोन विनंती व पाच आपसी बदल्या आहे, पंचायत समित्यांमधील विस्तार अधिकाऱ्यांच्या बदलीत एका विस्तार अधिकाऱ्याची प्रशासकीय, दोन विनंती व दोन आपसी बदल्या झाल्या आहेत. विस्तार अधिकारी सांख्यिकीची एकच प्रशासकीय बदली झालेली आहे.

महिला बालकल्याण विभागातील पाच पर्यवेक्षिकांची प्रशासकीय, दहा विनंती व एक आपसी बदल्या झालेल्या. विस्तार अधिकारी सांख्यिकीची एक बदली प्रशासकीय व एक विनंती बदली झाली. शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी पदाची एक प्रशासकीय, चार विनंती अशा पाच बदल्या झाल्या आहेत. केंद्रप्रमुख पदाची एक प्रशासकीय व आठ विनंती बदल्या झाल्या. दरम्यान, बदल्यांची प्रक्रिया सकाळी दहाला सुरवात होणार होती. मात्र त्याला उशीर झाल्याने जिल्हा परिषदेच्या सदस्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. बदल्यांची प्रक्रियेला वेळेत सुरवात करणे अपेक्षीत असल्याचे मत काहींनी सोशल मीडियावर व्यक्त केले.
संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satisfied with Gramsevak transfers in Ahmednagar Zilla Parishad