
संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ गावाने कृषी क्षेत्रातील विविध प्रयोग, जलसंधारण व वृक्षसंवर्धन, एकत्र कुटुंब पध्दती, दुग्धव्यवसाय, अस्थी विसर्जनातून पर्यावरण रक्षण, वृक्षारोपनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम यासारखे विविध दिशादर्शक राज्याला दिले आहेत.
संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ गावाने कृषी क्षेत्रातील विविध प्रयोग, जलसंधारण व वृक्षसंवर्धन, एकत्र कुटुंब पध्दती, दुग्धव्यवसाय, अस्थी विसर्जनातून पर्यावरण रक्षण, वृक्षारोपनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम यासारखे विविध दिशादर्शक राज्याला दिले आहेत.
या गावातील विविध उपक्रम व शेती प्रयोगांचे अनुकरण केल्यास गावे समृद्ध होण्यासाठी वेळ लागणार नाही, असे मत पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव योजनेचे मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी व्यक्त केले.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
डॉ. पोळ म्हणाले, पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावाने जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले काम व त्यासाठी घेतलेले परिश्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत. त्यातून गावात अमूलाग्र बदल झाल्याचे दिसते आहे. पर्यावरणाचे रक्षण करताना डोंगर, झाडे, जंगल, माती सांभाळणारी गावेच भविष्यात तग धरुन राहतील.
गावातील जलसमृध्दीसाठी प्रत्येक गावाने पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असून, शाश्वत शेती करताना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मातीचा सेंद्रिय कर्ब सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी रासायनिक खते, औषधांचा वापर कमी करुन, जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास हे शक्य आहे. या प्रयोगशील गावाने शेती, दुग्ध व्यवसाय व राबवलेले इतरही नाविन्यपूर्ण उपक्रम इतरांसाठी आदर्शवत आहेत.
गावकऱ्यांच्या प्रामाणिक कष्टातुन पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेतील सर्व कामे जवळपास पूर्ण झाल्याचे दिसत असून त्या कामांचे व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील ऑक्सिजन पार्क, प्रयोगशील शेती, एकत्र कुटुंब पद्धती, गव्हाच्या भुसापासून चालू असलेला आदर्शवत दुग्धव्यवसाय, समान पाणीवाटप उपक्रम व जलसंधारणाच्या कामांची पहाणी करून समाधान व्यक्त केले.
यावेळी पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक विक्रम फाटक, तालुका समन्वयक भैरवनाथ अडलिंग, राजेंद्र जाधव, डॉ. शंकर गाडे, पोलिस पाटील गोरक्ष नेहे, संतोष फापाळे, रामदास डोंगरे, गंगाराम ढोले, चांगदेव दरेकर, चैतन्य कासार, रवी नेहे, अजित फापाळे, हरिष नेहे, अरुण फापाळे, संदीप थिटमे, अशोक थिटमे, अविनाश नेहे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
संपादन : अशोक मुरुमकर