esakal | शिष्यवृत्तीच्या परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन? पालकांचा प्रश्‍न 
sakal

बोलून बातमी शोधा

Scholarship exams will be online or offline

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन, असा सवाल आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

शिष्यवृत्तीच्या परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन? पालकांचा प्रश्‍न 

sakal_logo
By
दौलत झावरे

अहमदनगर (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन, असा सवाल आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे पाचवी ते आठवीच्या शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असले, तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प आहे. शासनाने पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू केले तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्पच राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन, याकडे शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचेही लक्ष लागले आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक
कोरोनाच्या प्रादुर्भावातही शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन, तर काही ठिकाणी ऑफलाइन धडे देण्यात येत आहेत. मागील वर्षी पाचवीचे 30 हजार 927, तर आठवीचे 18 हजार 419 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट झाले होते. अद्याप विद्यार्थ्यांचे परीक्षेसाठीचे अर्ज भरून घेण्यात न आल्याने आकडा स्पष्ट होत नाही. विद्यार्थ्यांची संख्या कमी-जास्त होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

कोरोनामुळे दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच शिष्यवृत्तीचे धडे शिक्षकांनी ऑनलाइन व ऑफलाइन दिले. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे आता सराव परीक्षा सुरू झाल्या आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने प्रत्येक तालुक्‍यातून विषयनिहाय प्रश्‍नपत्रिका संच तयार करून घेतले आहेत. ते प्रत्येक शाळेला पाठविण्यात आले आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी अजूनही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्पच दिसून येते. शिष्यवृत्तीच्या परीक्षा ऑफलाइन घेणार की ऑनलाइन, याचा उलगडा झालेला नाही. त्याचा परिणाम परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर होऊ शकतो. त्यामुळे शिक्षण विभागाने याबाबत स्पष्टता जाहीर करणे गरजेचे आहे. तसा निर्णय होत नसेल, तर दोन्ही शक्‍यता गृहीत धरून विद्यार्थी व पालकांना ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षेसंदर्भात प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी पालकवर्गाकडून होत आहे. 

दृष्टिक्षेपात शाळा 
पाचवीच्या शाळा ः 1892 
आठवीच्या शाळा ः 1106 

विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी प्रश्‍नपत्रिका संच तयार करण्यात आला आहे. तो प्रत्येक शाळेला पाठविण्यात आला असल्याने, विद्यार्थ्यांना सराव करणे सोपे जाणार आहे. 
- रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग 


टक्का वाढविण्यासाठी उपाय 
- शिष्यवृत्ती परीक्षेचा शिक्षण समितीत दरमहा आढावा 
- पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांना निकाल उंचावण्याचे उद्दिष्ट 
- सराव परीक्षेच्या निकालाच्या विश्‍लेषणासाठी सॉफ्टवेअर तयार केले 
- व्हॉट्‌स ऍप ग्रुप तयार करून तालुकानिहाय शाळांच्या तयारीचा आढावा 
- शिष्यवृत्ती कार्यशाळा व सराव परीक्षेचे नियोजन 
- विद्यार्थ्यांच्या पाच सराव परीक्षा 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image