esakal | तीन मुले, कोणाला आयएएस व्हायचे आहे तर कोणाला आयपीएस
sakal

बोलून बातमी शोधा

Selection of three students from Navodya Vidya in Akole taluka

तीन मुले, कुणाला IAS व्हायचे आहे तर कुणाला IPS! तिन्ही मुले चांगली हुशार, म्हणून नवोदय विद्यालयात निवडली गेली. तिघांचीही कौटुंबिक परिस्थिती अशी आहे की नवोद्य नसते तर हुशार असूनही या मुलांच्या पुढील शिक्षणाची अजिबात खात्री देता आली नसती.

तीन मुले, कोणाला आयएएस व्हायचे आहे तर कोणाला आयपीएस

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : तीन मुले, कुणाला IAS व्हायचे आहे तर कुणाला IPS! तिन्ही मुले चांगली हुशार, म्हणून नवोदय विद्यालयात निवडली गेली. तिघांचीही कौटुंबिक परिस्थिती अशी आहे की नवोद्य नसते तर हुशार असूनही या मुलांच्या पुढील शिक्षणाची अजिबात खात्री देता आली नसती.

यंदा लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाली अन्‌ मुले नवोद्यमधून घरी आली. आधीच गरिबी, त्यात लॉकडाऊन! सगळीकडे झाली तशी याही मुलांची शाळा आता ऑनलाइन सुरू झाली. 

तिघांच्याही घरात मोबाईलच नसल्याने सगळा अभ्यास बुडतो. अशाप्रकारे मोबाईल नसल्याने अभ्यास बुडणारी ही त्यांच्या त्यांच्या वर्गांतील एकमेव मुले. तीनेक महिन्यांचा त्यांचा अभ्यास मोबाईलच्या अभावी असाच बुडाला. काही दिवसांपूर्वी शाळेकडून आम्हाला मुलांच्या या अडचणीविषयी कळाले. ज्या शाळेने आम्हाला घडवले तिच्याशी आमचे नक्कीच काही देणे लागते. म्हणून आम्ही जवाहर नवोदय विद्यालय, टाकळी ढोकेश्वरच्या सर्व वर्ग मित्र आणि मैत्रिणींनी मिळून त्या मुलांची मदत करण्याचे ठरविले आणि तिघांनाही एक एक मोबाईल व वर्षभराचे इंटरनेट रिचार्ज देऊन त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, याची व्यवस्था केली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या मुलांच्या पुढील उच्च शिक्षणाचीही व्यवस्था आणि त्यासाठीची सर्वतोपरी मदत आम्ही करू असे आम्ही तिन्ही मुलांना सांगितले आहे. तसेच शाळेलादेखील अजूनही अशी कोणी मुले असतील तर आम्ही त्यांचीही मदत करू असे सांगितले. कदाचित आम्हाला हे कार्य आणखी पुढे न्यायला स्फूर्ती मिळावी म्हणून शाळेने आम्हाला कौतुकाची थापही दिली.

एका पालकाने आम्ही तुमच्या या मदतीची परतफेड कशी करू, असे म्हंटले तेव्हा आम्ही त्यांना सांगितले. आम्ही तुमची मदत करत नसून आमचे कर्तव्य बजावत आहोत. त्यामुळे तुमचे पाल्य शिकून कमावते झाले की तुम्ही त्यांनाही अशीच कुणाचीतरी मदत करायला सांगा. तीच आमच्यासाठी आनंदाची गोष्ट ठरेल. अशीच एक एक ज्योत पुढे पेटवत गेले की अंधार नाहीसा होण्यास वेळ लागत नाही. याचा अनुभव सुद्धा आम्हाला लगेच आला. एका मुलाच्या घरी देण्यासाठी जेव्हा आमचे मित्र काही किराणा सामान खरेदी करत होते. तेव्हा आमच्या मदतीची माहिती कळाल्यावर त्या दुकानदाराने स्वतः तर्फेही काही सामान मदत म्हणून दिले. 

तसे पाहता ही आमची अगदीच छोटीशी मदत आहे. पण अशीच मदत आपण सर्वांनी कुणा न कुणाची केली तर त्यांच्या आयुष्यासाठी मात्र ती नक्कीच फार मोठी ठरू शकते. आपण सर्वांनी या कठीण काळात लोकांची आपापल्यापरीने काहीना काही मदत केली असेल. मात्र नेहमीच्या मदतीव्यतिरिक्त अशी मोबाईल सारखी वस्तूही अनेक गरीब मुलांच्या शिक्षणासाठी एक अत्यंत निकडीची गोष्ट बनली आहे. हे यासाठीच फेसबुकवर पोस्ट करत आहे की आपणही आपल्याला जमेल तसे गरजवंत विद्यार्थ्यांना आपल्या मित्रांसोबत मिळून किंवा जमले तर आपले जुने वर्किंग स्थितीतील मोबाईल देऊन मदत करावी ही सर्वांना विनंती.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top